इंदिरा गांधी विमानतळावर भला मोठा चरखा

charakha
दिल्ली- दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल तीन वर जगातील सर्वात मोठा चरखा मंगळवारी बसविण्यात आला. या चरख्याचे उद्घाटन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते झाले. म.गांधीजींच्या अहिंसक आंदोलनाचा प्रतीक म्हणून हा चरखा विमानतळावर बसविला गेला आहे. भारतात येणार्‍या विदेशी नागरिक व पर्यटकांना तो दाखविला जाणार आहे. या विमानतळावर दररोज साधारण दीड लाख प्रवासी येतात. म.गांधी द.अफ्रिकेतून स्वदेशात परत आले त्या घटनेला १०० वर्षे होत आहेत. त्याचे स्मरण म्हणून अनेक कार्यक्रम देशात राबिवले जाणार आहेत. हा चरखा त्याचाच एक भाग आहे.

अहमदाबादच्या खादी ग्रामोद्योग विभागाने हा २७ फूट लांब व १५ फूट उंचीचा चरखा टीक वूडपासून तयार केला आहे. त्याचे वजन ४ टन इतके आहे. २६ कारागिर आणि सुतार यांनी हा चरखा ४० दिवसांत तयार केला असून तो किमान ५० वर्षे चांगल्या स्थितीत राहिल असे सांगितले जात आहे. खादी ग्रामोद्योग विभागाचे अध्यक्ष व्ही.के. सक्सेना यांनी हा चरखा इंदिरा गांधी विमानतळावर बसविला जावा असे सुचविले होते. त्यांची ही कल्पना केंद्र सरकारने उचलून धरली असेही सागितले जात आहे.

Leave a Comment