ट्रायचा डेटा पॅक व्हॅलिडिटी १ वर्षाचा करण्याचा प्रस्ताव

trai
मुंबई : मोबाईल इंटरनेट पॅक व्हॅलिडिटी ९० दिवसांवरुन एक वर्ष करण्याचा प्रस्ताव ट्रायने (टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया) मांडला आहे. लहान ग्राहक जेणेकरुन इंटरनेट पॅकचा वापर अधिकाधिक वाढवतील. ट्रायने याबाबतची माहिती एका पत्रकाद्वारे दिली.

आपल्या पत्रकात ट्रायने म्हटले आहे की, विविध मुद्द्यांचा अभ्यास केल्यानंतर असा प्रस्ताव आहे की इंटरनेट पॅक व्हॅलिडिटी ९० दिवसांवरुन १ वर्ष करावे. पहिल्यांदाच इंटरनेट पॅक वापरणाऱ्या ग्राहकांना याचा फायदा होईल. याबाबत येत्या २६ जुलैपर्यंत सर्वसामान्य लोक आणि टेलिकॉम कंपन्यांकडून सूचना मागवल्या आहेत. ट्रायने देशातील लोकांना डिजिटल युगाशी जोडण्यासाठी आणि तंत्रज्ञान साक्षरता वाढवण्यासाठी अशाप्रकारे पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अनेकदा पहिल्यांदाच इंटरनेट वापरणारे ग्राहक प्री-पेड प्लॅन वापरतात. मात्र, त्यांच्या पॅकला मिळणारी व्हॅलिडिटी कमी दिवसांची असते. ती वाढवल्यास अधिकाधिक लोक इंटरनेट वापराकडे वळतील, असे ट्रायचे मत आहे.