‘पतंजली’च्या जाहिराती अवास्तव आणि अवमानकारक

Patanjali
जाहिरात मानक परिषदेचे शिक्कामोर्तब
नवी दिल्ली: योगगुरू बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली आयुर्वेद’च्या उत्पादनांच्या जाहिराती आपल्या उत्पादनाबद्दल अवास्तव दावे करणाऱ्या आणि प्रतिस्पर्धी उत्पादनांचा अवमान करणार असल्याच्या तक्रारींमध्ये तथ्य असल्याचा निष्कर्ष भारतीय जाहिरात मानक परिषदेने (एएससीआय) काढला आहे.

‘पतंजली’च्या जाहिरातींच्या विरोधात अनेक प्रतिस्पर्धी कंपन्यांनी तब्बल ६७ तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीत तथ्य असल्याचे नियामक परिषदेने आपल्या अहवालात नमूद केले आहे.

‘कच्चे घानी का सरसो तेल’ या पतंजली उत्पादनाच्या जाहिरातीमध्ये अन्य स्पर्धक कंपन्या ‘सॉल्व्हंट अॅक्स्ट्रॅक्शन’ प्रक्रियेद्वारे भेसळ केलेले तेल विकत असल्याची टीका आहे. या तेलात ‘न्यूरोटॉक्सिन’ असल्याचेही जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे. मात्र यात तथ्य असल्याचे मानता येत नाही; असे या अहवालात म्हटले आहे.

‘पतंजली’ उत्पादनांच्या जाहिरातीत करण्यात आलेले दावे अवास्तव असून त्यामुळे ग्राहकांची दिशाभूल होत असल्याचेही परिषदेने स्पष्ट केले आहे.

‘पतंजली’ फळांच्या ज्यूसच्या जाहिरातीमध्ये करण्यात आलेले दावे सिद्ध होत नाहीत. इतर ज्यूसमध्ये ‘पल्प’ अपराला असून त्याच्या किंमती अधिक असल्याचा दावा या जाहिरातीत करण्यात आला आहे. अशा दाव्यांमुळे इतर उत्पादनांची बदनामी होत असल्याचा आक्षेप परिषदेने घेतला आहे.

त्याचप्रमाणे जनावरांचा चारा ‘दुग्धामृत’, ‘दंतकांती’ टूथपेस्ट यांच्या जाहिरातीही अवास्तव दावे करणाऱ्या आणि इतर स्पर्धकांची बदनामी करणाऱ्या असल्याचे अहवालात निदर्शनास आणून देण्यात आले आहे.

नियामक परिषदेने निस्सान, टाटा मोटर्स, अॅमेझॉन, कोलगेट-पामोलिव्ह, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयडिया सेल्यूलर आणि रिलायन्स इन्डस्ट्रीज यांच्यावरही अयोग्य पद्धतीच्या जाहिराती केल्याचा ठपका ठेवला आहे.

Leave a Comment