सौंदर्यवतींच्या व्हेनेझुएलात महागाईचा कहर

venezu
जगाला ६ मिस वर्ल्ड, ७ मिस युनिव्हर्स, ६ मिस इंटरनॅशनल आणि २ मिस अर्थ अशा सौंदर्यवतींची देणगी देणार्‍या व्हेनेझुएलात सध्या महागाईने कहर केला आहे. खाद्यपदार्थांच्या किमती इतक्या प्रचंड वाढल्या आहेत की आठवड्यातले चार पाच दिवस कसेबसे जेवण मिळते आहे तर कित्येक महिने पोटभर अन्न न मिळालेले अनेक नागरिकही येथे भुकेशी सामना करताना दिसत आहेत. नाणेनिधीच्या अहवालानुसार या देशातील महागाई १२०० टक्कयांनी वाढण्याचे संकेत मिळत आहेत.

व्हेनेझुएलामध्ये एका अंड्यासाठी ९०० रूपये, १ लिटर दुधासाठी १३ हजार रूपये तर कणकेला एका किलोसाठी १३५० रूपये मोजावे लागत आहेत. दुधाचा ट्रक आला की एकतर लुटालूट माजते किंवा दुधासाठी अक्षरशः किलोमीटर लांबीचा रांगा लागत आहेत. गेली दोन वर्षे पडत असलेले दुष्काळ व देशाचे प्रमुख उत्पन्न असलेल्या क्रूड ऑईलच्या जगाच्या बाजारात घसरलेल्या किंमती यामुळे या देशावर ही पाळी आली आहे. दुष्काळामुळे पाणीटंचाईचे संकटही भेडसावते आहे आणि वीज निर्मिती थांबली असल्याने अनेक ठिकाणी वीज नाही. त्याचा परिणाम रूग्णालयांवरही होत असून येथे डायलिसिस बंदच केले गेले आहे. परिणामी अनेकांना मृत्यूस सामोरे जावे लागत असून औषधांचाही तुटवडा आहे.

जगातला व्हेनेझूएला हा बडा क्रूड उत्पादक व निर्यातदार देश आहे. मात्र कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्याने देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यासाठी देशाच्या चलनाचे अवमूल्यन केले गेले आहे मात्र त्यामुळे कर्जाचा बोजा ८लाख कोटी डॉलर्सवर गेला आहे. राष्ट्रपती निकोलस मडुरो यांनी देशात आर्थिक आणीबाणी जाहीर केली आहे.

Leave a Comment