कोणार्क मुख्य मंदिर ११३ वर्षांनंतर खुले होणार

konark2
ओडिशामधील जगप्रसिद्ध कोणार्क सूर्यमंदिराचे गेली ११३ वर्षे बंद अवस्थेत असलेले मुख्य मंदिर खुले होण्याची शक्यता मिर्माण झाली आहे. हे मंदिर ७६१ वर्षे जुने आहे. दरवर्षी या सूर्यमंदिराला भेट देण्यासाठी देश विदेशातून सरासरी २८ लाख पर्यटक येत असतात मात्र कुणालाच मुख्य मंदिराचे दर्शन घेणे आजपर्यंत शक्य झालेले नाही कारण ते बंदच आहे. राजधानी भुवनेश्वरपासून साधारण दीड तासाच्या अंतरावर बंगाल खाडी तटावर हे मंदिर असून अर्क म्हणजे सूर्य व कोण म्हणजे कोन अशी त्याची उत्पत्ती सांगितली जाते.

गंगवंश राजा नृसिंह देव याने १२५५ सालात या भव्य मंदिराची निर्मिती केली. त्यानंतर या मंदिरावर अनेकवेळा मुघली आक्रमणे झाली तसेच अनेक नैसर्गिक संकटेही कोसळली. त्यात हे मंदिर खराब झाले. १९०३ साली तत्कालीन गर्व्हनर जॉन वुडबर्न याने जगमोहन मंडप हा मंदिराचा मुख्य भाग वाळू भरून बंद करून टाकला तो आजतागायत बंदच आहे. मात्र ऑस्ट्रेलियन तसेच काही भारतीय पुरातत्व तज्ञांच्या मते जगमोहन मंदिर वाटते तितके खराब झालेले नाही त्यामुळे ते पुन्हा उघडले जाणार आहे.

konark1
कलिंगा स्थापत्य शैलीतील हे मंदिर वास्तुकलेचा अजोड नमुना आहे. यात सूर्यदेवाचा १२ चाकांचा रथ, सात घोडे याच्यासह खडकांत कोरले गेले आहेत. सात घोड्यांपैकी सध्या एकच सुस्थित आहे. तसेच या मंदिराच्या बाहेरच्या बाजूला आठ फुटी उगवता सूर्य, त्याच्यापेक्षाही मोठा मध्यानीचा सूर्य व साधारण चार फुटी मावळता सूर्य अशा सूर्यदेवाच्या अप्रतिम प्रतिमा तीन बाजूनी कोरल्या गेल्या आहेत. सूर्याच्या रथाची बारा चाके म्हणजेही शिल्पकलेचा अत्यंत सुंदर नुमना असून या पूर्ण मंदिरासाठी २८ टन वजनाचे दगड वापरले गेले आहेत. कोणार्कच्या सूर्यमंदिराची चाके त्यांच्या सौदर्यामुळे अनेक ठिकाणी प्रतिके म्हणून वापरली गेली आहेत. शिवाय नट मंदिरांच्या भिंतीवर कोरलेल्या नर्तिका प्रतिमाही अशाच अत्यंत सुंदर व सौष्ठवपूर्ण आहेत.

konark
स्थानिकांच्या सांगण्यानुसार आजही या नर्तिकांचे आत्मे येथे येतात. सायंकाळच्या वेळी येथे घुंगरांचे आवाजही येतात. हे मंदिर बांधणार्‍या प्रमुख वास्तू विशारदाची राजाने हत्या केली व त्यानंतर वास्तूविशारदाच्या मुलाने येथे आत्महत्या केली असे सांगितले जाते. त्यामुळे येथे अठराव्या शतकापासून कोणतीही पूजा अथवा धार्मिक अनुष्ठाने केली जात नाहीत.

Leave a Comment