एकटेपणा मिटविण्यासाठी ‘भाड्या’ने मिळेल मित्र

lonely
नवी दिल्ली: सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत व्यक्तीच्या आयुष्यातील एकटेपणा वाढत चालला आहे. हा एकटेपणा मिटविण्यासाठी मित्र किंवा मैत्रीण भाड्याने मिळण्याची सुविधा एका वेबसाईटने उपलब्ध करून दिली आहे. या प्रकारामुळे सध्याच्या पिढीच्या मानसिकतेचे विदारक चित्र स्पष्ट होत आहे.

‘रेंट अ फ्रेंड डॉट कॉम’ या वेबसाईटवर भाड्याने मित्र मिळवून देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा घेण्यासाठी या वेबसाईटचे सदस्यत्व घेणे आवश्यक आहे. या सदस्यत्वासाठी काही रक्कम आकारली जाते. सदस्यत्व घेतल्यानंतर या माध्यमातून आपल्याला भाड्याने मित्र अथवा मैत्रीण मिळू शकते. त्याच्याबरोबर आपण चित्रपट पाहणे, डिनर, डेट असे काहीही करू शकता. या प्रत्येक बाबीसाठी वेगवेगळे दर आकारले जातात.

आपली वेबसाईट ही डेटींग अथवा एस्कॉर्ट वेबसाईट नाही. या माध्यमातून केवळ एकमेकांची भेट करून देण्याचे काम केले जाते. मैत्री करण्याची संधी दिली जाते; असा या वेबसाईटच्या संचालकांचा दावा आहे.
सध्याच्या काळात सोशल नेटवर्कींगसाठी अनेक साधने उपलब्ध असली तरीही या आभासी माध्यमातून एकटेपण संपत नाही; हे यावरून दिसून येत आहे. गर्दीत राहूनही हे एकटेपण छळत राहते. त्यासाठी असे ‘भाड्या’चे उपाय देखील शोधले जातात हे ही स्पष्ट आहे.

Leave a Comment