स्वदेशी गाईंना मिळणार ओळखपत्रे

cow
पशुपालन विभागाने एक महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली असून त्यानुसार देशातील सर्व स्वदेशी गाई तसेच दुभत्या जनावरांना आधार कार्डप्रमाणे ओळखपत्रे दिली जाणार आहेत. यामागे या गाईंची पैदास वाढावी तसेच दुधाचे उत्पादन वाढावे व त्याचा थेट फायदा छोट्या व गरीब शेतकर्‍यांना मिळावा असा उद्देश आहे. देशात २०२० पर्यंत दुधाचे उत्पादन सध्याच्या दुप्पटीवर नेले जाणार आहे.त्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत.

पशुपालन विभागाचे सचिव देवेंद्र चौधरी या संदर्भात माहिती देताना म्हणाले की देशात सध्या ८५ दशलक्ष दुभत्या स्वदेशी गाई आहेत. या जनावरांच्या दुध उत्पादनात वाढ करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. छोट्या व गरीब शेतकर्‍यांकडे आजमितीला असलेल्या गाईंमधील ७० टक्के गाई स्वदेशी आहेत. त्या दिवसाकाठी १ ते दोन लिटर इतकेच दूध देतात. हे दूथ पाच लिटरपर्यंत वाढविण्यासाठी योजना राबविल्या जात आहेत. यामुळे या शेतकर्‍यांचे वार्षिक उत्पन्न वाढू शकणार आहे. त्यासाठी सर्व दुभत्या जनावरांना ओळखपत्रे दिली जात असून त्यावर त्यांची सर्व माहिती असेल. म्हणजे दूध किती देतात, काही आजार आहेत का, वितांची संख्या किती अशी सर्व माहिती यावर असेल.

ही योजना राज्य सरकारच्या मदतीने राबविली जाणार आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात ८५ टक्के दुभत्या गाईंना टॅग म्हणजेच ओळखपत्रे दिली जातील. २०१६-१७ या काळात ५ दशलक्ष, १७-१८ या काळात २५ ते ३० दशलक्ष व १९-२० सालात उरलेल्या सर्व दुभत्या जनावरांना ओळखपत्रे व हेल्थ कार्ड दिली जाणार आहेत. देशातील १४ राज्यात गाईंची संख्या अधिक असून त्यात उत्तरप्रदेश व मध्यप्रदेश आघाडीवर आहेत.

Leave a Comment