सुदर्शन पटनायक यांची आणखी एका जागतिक विक्रमाकडे वाटचाल

sudrshan-patnaik
भुवनेश्‍वर – आणखी एका जागतिक विक्रमाकडे प्रख्यात वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी वाटचाल सुरू केली असून त्यांनी भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेच्या पार्श्‍वभूमीवर ओडिशाच्या पुरी येथील किनारपट्टीवर वाळूचे शंभर रथ साकारण्याचा निर्णय घेतला आहे.

येथे नऊ दिवस चालणार्‍या जगन्नाथ रथयात्रेच्या काळात भाविकांना भव्य लाकडी रथांवर विराजमान भगवान बलभद्र, भगवान जगन्नाथ आणि देवी सुभद्रा यांच्या दर्शनासोबतच पटनायक यांच्या वाळूशिल्पाचेही दर्शन घेता येणार आहे.

शुक्रवारपासून माझ्यासोबतच माझ्या संस्थेतील २५ विद्यार्थ्यांनी वाळूंचे शंभर रथ तयार करण्याचे कार्य सुरू केले आहे. आज दुपारपर्यंत या सर्व शिल्पाकृती तयार झालेल्या असेल. रथयात्रेला ६ जुलैपासून सुरुवात होणार असल्याने दोन दिवस आधीच आम्ही वाळूंचे शंभर रथ तयार करणार आहोत, असे पटनायक यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

आतापर्यंत ५० पेक्षा जास्त रथांची निर्मिती माझ्या चमूने केली आहे. हा विक्रम लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समाविष्ट व्हावा, अशी माझी इच्छा आहे. लिम्का बुकाच्या संपादकांनीही आम्हाला अधिकृत परवानगी दिली आहे. त्यांच्या सूचनेनुसारच आम्ही हे कार्य हाती घेतले आहे, असे ते म्हणाले. प्रत्येकच वर्षी रथयात्रेशी संबंधित वाळूशिल्प तयार करणारे पटनायक यांची यावषी जास्तीतजास्त पर्यटकांना आकर्षित करण्याची इच्छा आहे.

Leave a Comment