भारतीय अमेरिकन भौतिक शास्त्रज्ञाची ११ दशलक्ष डॉलर्सची देणगी

mani-bhaumik
वॉशिंग्टन : भारतीय अमेरिकन भौतिक शास्त्रज्ञाने युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाला निसर्गाच्या मूलभूत नियमांचा पुढच्या टप्प्यातील अभ्यास करण्याच्या हेतूने एक केंद्र स्थापन करण्यासाठी तब्बल ११ दशलक्ष डॉलर्सची देणगी दिली आहे. विद्यापीठाच्या इतिहासातील आतापर्यंतची ही सर्वांत मोठी देणगी आहे. ही देणगी देणारे मणी भौमिक यांचे परोपकारी नेतृत्व आणि विद्यापीठावर दाखविलेल्या विश्‍वासाबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो, असे विद्यापीठाचे कुलगुरु गिनी ब्लॉक यांनी म्हटले आहे. मणी एल. भौमिक इन्स्टिट्यूट फॉर थिरॉटिकल फिजिक्स हे जगातील आघाडीचे केंद्र करण्याची आमची योजना आहे, असे विद्यापीठाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

भौमिक इन्स्टिट्यूट विद्वानांचे आदरातिथ्य करेल, शैक्षणिक क्षेत्रातील लोकांसाठी परिसंवाद व परिषदांचे आयोजन करेल आणि विद्यापीठाने भौतिकशास्त्राच्या अभ्यासात केलेल्या प्रगतीची माहिती समाजाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. पश्चिम बंगालच्या एका दुर्गम खेड्यात जन्मलेले भौमिक अत्यंत गरीब परिस्थितीत लहानाचे मोठे झाले व कालांतराने त्यांनी या क्षेत्रात नाव कमावले. डोळ्यांवर लेसिक शस्त्रक्रिया करण्यासाठी लेझर तंत्रज्ञानाचा विकास करण्यात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे.

१६ वर्षांचा होईपर्यंत मी बूटही घातला नव्हता आणि अनवाणी पायाने चार मैलांवर असलेल्या शाळेत जात असे, असे भौमिक यांनी म्हटल्याचे या निवेदनात म्हटले आहे. प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञ सत्येंद्र बोस यांच्या मार्गदर्शनात भौमिक यांनी कलकत्ता विद्यापीठातून मास्टर्स पदवी प्राप्त केली. १९५८ मध्ये खडगपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून भौतिकशास्त्र विषयात डॉक्टरेट मिळविणारे पहिले विद्यार्थी होण्याचा बहुमान त्यांनी मिळविला होता. तीन अमेरिकन डॉलर्स खिशात घेऊन भौमिक १९५९ मध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठात आले. मला विमानाने अमेरिकेत जाता यावे यासाठी गावातील लोकांनी पैसे गोळा केले, अशी आठवणही भौमिक यांनी सांगितले.

Leave a Comment