पावसाळी पिकनिकला जात आहात; तर या ठेवा गोष्टी लक्षात !

monsoon
कितीतरी पर्यटक पावसाळा आला की पावसाचा आनंद घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातात. पावसाळ्यात जास्तीत जास्त लोकांची पसंती ही हिल्स स्टेशन, वॉटरफॉल, डॅम, समुद्र किनारे या ठिकाणांना असते. याबाबतीत तरूण मंडळी जरा जास्तच हौशी असते. तर यात अनेक कुटुंबेही समोर असतात. पण पावसाचा आनंद लुटताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये याचीही खबरदारी घेतली पाहिजे.

अनेक ठिकाणी पावसाळा सुरू झाल्यापासून काही मुले धरणात बुडून किंवा नदीच्या पात्रात बुडून मरण पावल्याच्या घटना घडल्या आहेत. ह्या घटना आनंदाच्या भरात योग्य ती काळजी न घेतल्याने घडत असल्याचे साधारण चित्र आहे. त्यामुळे लहान मुले, तरूण, वयोवॄद्ध लोकांनीही फिरायला गेल्यावर विविध प्रकारची काळजी घेणे गरजेचे आहे. खासकरून तरूण मंडळीनी जास्त जोशात येणे चुकीचे आहे. अशा घटना टाळण्यासाठी आम्ही काही खास टिप्स घेऊन आलो आहोत. यातून अशाप्रकारच्या घटना टाळता याव्या हाच उद्देश आहे.

पावसाचा आनंद घेण्यासाठी तरूण मंडळी फिरायला जाण्यात जास्त उत्सुक असतात. हिल्स स्टेशन, डॅम, नदी अशा ठिकाणी तरूण मंडळी अधिक जातात. अनेकांचा बाईकने जाण्याचा हट्ट असतो. पण पावसाळ्यात पावसामुळे अनेक रस्त्यांची स्थिती वाईट झालेली असते. रस्त्यावरील डबक्यात पाणी साचल्याने ते दिसण्यात येत नाहीत, अशात अपघात होण्याची जास्त शक्यता असते. रस्त्यावर चिखल आल्याने बाईक स्लिप होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. अनेकजण ड्रिंक करून रेसिंग करण्यातही धन्यता मानतात पण हे धोक्याचे आहे. त्यांनी असे करून जीवन धोक्यात घालवू नये.

पावसाळ्यात पिकनिकला गेल्यावर अनेकजण ड्रिंक करतात. ड्रिंक केल्यानंतर आलेल्या नशेत अनेकजण नदीत, समुद्रात पोहण्यासाठी जातात. अनेकजण तर स्विमिंग येत नसूनही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये ते नदीत उड्या घेतात. मग पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडतात. शिवाय ड्रिंक केल्यावर शरीर जड होत असल्याने लवकर स्वत:चा बचावही करता येत नाही. त्यामुळे पिकनिकला ड्रिंक करणे हे धोक्याचे आहे.

तरूणांप्रमाणे काही तरूणीही अनेक ठिकाणी पिकनिकला आलेल्या असतात. अशात तरूणींना इंप्रेस करण्यासाठी किंवा त्यांचे लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी उगाच काहीही जास्तीचे काम करण्याचा मोह टाळा. अनेकजण तरूणींना इंप्रेस करण्यासाठी नदीत, समुद्रात फिल्मी स्टाईलने उड्या घेतात. पण त्याचा फटका तुम्हालाच बसू शकतो.

कुणी जर तुम्हाला नदीत, समुद्रात उडी मारायला किंवा डोंगराच्या टोकावर जाऊन उभे राहण्यासाठी फोर्स करत असेल आणि मोठेपणा म्हणून तुम्ही मोठ्या जोशात असे काही करत असाल तर सावधान व्हा. पावसाळ्याच्या दिवसात नदीच्या पात्रात गाळ साचलेला असतो. तर समुद्रातील पाण्याचा अंदाज येत नाही. शिवाय समुद्राच्या लाटा तुम्हाला तग धरू देत नाहीत. त्यामुळे उगाच जोशमध्ये येऊन काही करू नका. पाण्याबाहेर राहूनही तुम्ही पावसाचा आनंद घेऊ शकता. सैराट सिनेमातील कलाकाराने नदी घेतली उडी सध्या क्रेझ बनत आहे. अनेकजण तशी उडी मारण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसे करणे तुम्हाला महागात पडू शकते.

या दिवसात डोंगराच्या टोकावर, समुद्रात, वाहत्या नदीच्या कडेला असे सेल्फी घेण्याचा मोह करू नका. सेल्फीचे अलिकडे सर्वांनाच वेड लागले आहे. दुसरीकडे सेल्फीमुळे जीव जाणा-यांच्या संख्येतही वाढ होते आहे. वेगळा सेल्फी घेण्यासाठी तरूण मंडळी कशाचाही विचार करत नसल्याचे दिसून आले आहे. अशात निसर्गाशी खेळ करण्याचा मोहही टाळला पाहिजे.

ट्रेकिंगला जाणारे अनेक ग्रुप्स वेगवेगळ्या शहरांमध्ये आहेत. तरूण-तरूणींचे हे ग्रुप्सही पावसाळ्यात ट्रेकिंगला जातात. पण पावसाळ्यात डोंगर भिजलेले असतात. अनेक ठिकाणी पाणी मुरल्याने अनेक भाग भुसभुशीत झालेले असतात. भलेही तुमच्याकडे ट्रेकिंगसाठी आवश्यक साहित्य असली तरी डोंगरावर चिखल झाल्याने घसरण्याची भीती अधिक असते, त्यामुळे काळजी घ्या.

या दिवसात कुठेही पिकनीकला जाताना सोबत एक मेडिकल किट असणे गरजेचे आहे. काही हो अथवा न हो सोबत असलेली बरी. कारण ज्या ठिकाणी तुम्ही जाताय तिथे काहीही होऊ शकते. अशी ठिकाणे शहरांपासून किंवा गावांपासून जरा लांब असतात. अशावेळी काही झाल्यास वेळेवर मदत न मिळाल्याने मोठा अनर्थ होऊ शकतो. त्यामुळे एक मेडिकल किट सोबत ठेवाच.

Leave a Comment