मुंबईत बनणार ज्युलरी पार्क

diamond
मुंबई- ज्युलरी उद्येागाच्या निर्यात वाढीला चालना देण्यासाठी मुंबईत ज्युलरी पार्क उभारले जाणार असून त्यासाठी केंद्राकडून ५० कोटी रूपये दिले जाणार आहेत. या पार्कसाठी जमीन राज्यसरकार देणार आहे. या पार्कमुळे हिरे व्यवसायातील छोटे व्यावसायिक, त्यांचे कर्मचारी यांना कॉमन फॅसिलीटेशन सेंटरचा लाभ घेता येणार आहे. या मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरमध्ये प्रशिक्षण, टेस्टींगची तसेच लॅबची सुविधाही दिली जाणार आहे. या पार्कमुळे विशेषतः हिरे दागिन्यांच्या किमती कमी होण्यास व त्यामुळे निर्यात वाढीस हातभार लागणार आहे.

या पार्कमुळे किमान ८० हजार जणांना रोजगार मिळेल असेही समजते. तसेच या पार्कचा फायदा उद्योगात स्पर्धावाढीसाठीही होणार आहे. सध्या छोट्या प्रमाणावर हिरे व्यापार करणार्‍या व्यावसायिकांना हिरे घडविण्यासाठी लागणारी महागडी मशीन्स खरेदी करणे शक्य होत नाही व त्यामुळे ही कामे बाहेरून करून घेतली जातात. नव्या पार्कमुळे हिरे कापणे, घडविण्यासाठी लागणारी मशीनरी भाडे तत्त्वावर मिळू शकणार आहे.

गुजराथमध्येही कच्चे हिरे पॉलिश, कटींगसाठी चार सेंटर्स उभारली जात आहेत. सध्या ओव्हरसीज मार्केटमधील मागणी घसरल्याने निर्यात गतवर्षीच्या तुलनेत घसरली असून ती ३२ अब्ज डॉलर्सवर आली असल्याचे समजते. ही निर्यात वाढण्यास पार्क सुविधा उपयुक्त ठरेल असे हिरे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

Leave a Comment