१५०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक भारताला हवी

arun-jaitley
बीजिंग : आगामी दहा वर्षांच्या काळात देशाला भारतातील पायाभूत सुविधांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी किमान १५०० अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची गरज असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी येथे दिली.

जागतिक अर्थव्यवस्थेतील घसरण थांबविण्याचा पायाभूत सुविधांचा विकास हाच एकमेव मार्ग आहे. जागतिक गुंतवणूकदारांना आकर्षित करायचे असेल, तर देशातील पायाभूत सुविधांचा विकास करावाच लागणार आहे, असे पाच दिवसांच्या चीन दौ-यावर असलेले अरुण जेटली यांनी आशिया इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बोलताना सांगितले.

जगभरातच घसरण सुरू असताना भारताने शाश्‍वत वाढीसाठी पायाभूत सुविधांचा विकास करण्याची गरज आहे. आगामी दहा वर्षांत आपल्याला किमान १.५ ट्रिलियन डॉलर्स म्हणजेच १५०० अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची गरज भासणार आहे. पायाभूत सुविधा क्षेत्रातील तूट भरून काढण्यावर भर द्यावा लागेल. पायाभूत सुविधा क्षेत्राचा विकास झाला तरच जागतिक अर्थव्यवस्थेतील घसरण थांबेल. देशातील पायाभूत सुविधा मोहिमेंतर्गत ग्रामीण भागात स्वच्छतेला प्राधान्य दिले जाईल. महामार्ग बांधणीचे या वर्षीचे उद्दिष्ट १० हजार किलोमीटरचे आहे. देशातील रेल्वेचे जाळे शंभर वर्षे जुने आहे. त्यामुळे रेल्वेचीही आता आधुनिकीकरणाकडे वाटचाल सुरू आहे. रेल्वेस्थानकांचे व्यावसायिक केंद्रात रूपांतर करण्यासाठी सरकार खाजगी क्षेत्राला सहभागी करून घेत आहे, असेही जेटली यांनी सांगितले.

Leave a Comment