आई होणे म्हणजे मरणयातना

preganancy
प्रत्येक स्त्रीला आई होण्याची आस असते. तिच्या आयुष्याचे सार्थक आई होण्यातच आहे अशी तिची कल्पना असते. परंतु आई होणे किती अवघड आहे (निदान भारतात तरी) याची कल्पना प्रत्येक स्त्रीला असतेच असे नाही. मात्र मुंबईमध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनात असे आढळले आहे की प्रसुती हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातला अतीशय कठीण असा काळ असतो आणि भारतात अतीशय असुरक्षितपणाने बाळंतपण करण्यात येत असल्याने हा काळ भारतीय महिलांसाठी अधिक कष्टप्रद आणि तीव्र वेदनादायक असतो. नुकत्याच जागतिक पातळीवर करण्यात आलेल्या एका पाहणीमध्ये असे दिसून आले आहे की पहिल्या बाळंतपणात मरणार्‍या महिलांची संख्या जगात भारतात सर्वात जास्त आहे. देशातल्या प्रत्येक महिलेला सुरक्षित प्रसुतीचा अधिकार बहाल करण्यात आपल्या देशातली सरकारे कमी पडली आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेच्या एका पाहणीमध्ये पुढे आलेला आकडा तर फारच उद्वेग आणणारा आहे. भारतात दर तासाला एक महिला पहिल्या बाळंतपणात दगावते. हे दगावण्याचे प्रमाण अर्थातच ग्रामीण भागात जास्त आहे आणि त्या मानाने शहरात प्रसुतीच्या सोयी अधिक प्रमाणात उपलब्ध आहेत त्यामुळे अशा मृत्यूचे प्रमाण शहरात कमी आहे. मात्र ते तुलनेने कमी असले तरी मानवी निर्देशांकाचा विचार केला असता इतर देशापेक्षा जास्त आहे. आफ्रिका खंडातील कांगो, मोझांबिक अशा अतीशय मागासलेल्या देशातसुध्दा बाळंतपणात मरणार्‍या महिलांचे प्रमाण भारतापेक्षा कमी आहे. मुंबईतील महिला विकार तज्ञ डॉ. रागिणी कुलकर्णी यांनी या संबंधात केलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष तर असे सांगतात की जेव्हा एक महिला बाळंतपणात मृत्यूमुखी पडते तेव्हा ती अतीशय तीव्र वेदना सहन करून शेवटी प्राण सोडते.

एखादी महिला मरण पावते परंतु तिच्या सोबत ९ महिला अशा असतात की ज्यांना प्रसुती वेदना फार कठीण गेलेल्या असतात. एक महिला मृत्यू पावते परंतु ९ महिला प्रसुती वेदना सहन करता करता मृत्यूच्या जवळ गेलेल्या असतात. मुंबईमध्ये अशा महिलांचे प्रमाण खूप मोठे आहे. बाळंतपणासाठी माहेरी आलेल्या मुलीला दवाखान्यात कधी न्यावे, त्याच्या आधी काय दक्षता घ्यावी याचे मार्गदर्शन तिच्या आईवडिलांना मिळालेले नसते. यातल्या कित्येक महिलांची नावेसुध्दा सरकारी रुग्णालयात नोंदलेली नसतात आणि अगदीच हाताबाहेर प्रकरण चालले की त्या प्रसुती वेदना सहन करणार्‍या मुलीला मुंबईच्या दवाखान्यात आणतात. अशा मुलींच्या पालकांना योग्य शिक्षण दिले तर ते आपल्या प्रसूत होणार्‍या मुलीला वेळेवर दवाखान्यात आणतील आणि प्रसुती वेदनांची तीव्रता बर्‍याच अंशी टाळता येईल.