डॉ.राजेंद्रप्रसादांचे बँक खाते आजही सुरू

prasad
भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या निधनाला ५० वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी पटण्याच्या पंजाब नॅशनल बँकेत त्यांचे खाते आजही सुरू आहे. विशेष म्हणजे आजही या खात्यात पैसे भरले जातात व ते कोण भरते याची माहिती मिळालेली नाही.

या बँकेचे प्रमुख संजय कुमार म्हणाले २४ आक्टोबर १९६२ साली हे खाते सुरू केले गेले आहे व त्यावर सदाकत आश्रम, पटणा असा पत्ता आहे. डॉ. राजेंद्र प्रसाद राष्ट्रपतीपदावरून निवृत्त झाल्यानंतर या आश्रमात राहात होते व तेथेच त्यांची प्राणज्योत मालविली. त्यांच्या बँकेतील चालू खात्यातील पैसे शिक्षण प्रसाराला प्रोत्साहन देण्यासाठी वापरले जातात. सध्या त्यांच्या खात्यात ७३०० रूपये आहेत. रिझर्व्ह बँकेने हे खाते डेफ अकौंट म्हणून घोषित केले आहे. अशा खात्यातील पैसा शिक्षण प्रसारासाठी वापरला जातो.

संजय कुमार म्हणाले आमच्या शाखेने राष्ट्रपतींचे हे खाते डिस्प्ले केले आहे. त्यावरून ग्राहक व कदाचित बँकेचे कर्मचारीही त्यात पैसे भरतात. अगदी ५० रूपयांपासून यात रक्कम भरली जाते. त्यांच्या परिवारापैकी कुणीही या खात्यावर हक्क सांगितलेला नाही. प्रसाद यांची नात तारा सिन्हा म्हणाल्या आम्ही कुणीच या खात्यावर क्लेम केला नाही व त्याचा वापर शिक्षणासाठी होत असेल तर ती आनंदाचीच बाब आहे.

Leave a Comment