‘अवरमाईन’ने केले सुंदर पिचाई यांचे अकाऊंट हॅक!

sundar-pichai
नवी दिल्ली – ‘फेसबुक’चे संस्थापक मार्क झकरबर्ग यांचे ट्विटर आणि पिंट्रेस्ट अकाऊंट काही दिवसांपूर्वी हॅक करणाऱ्या गटाने आता थेट गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनाच झटका दिला असून, त्यांचे ‘क्युरा’ अकाऊंट या गटाने हॅक केले. विविध इंग्रजी संकेतस्थळांवर या संबंधीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.

सुंदर पिचाई यांचे ‘क्युरा’ या कम्युनिटी आधारित प्रश्नोत्तराच्या साईटवरील अकाऊंट ‘अवरमाईन’ या हॅकर गटाने हॅक केले असून, त्यांच्या अकाऊंटवर या गटाकडून सकाळपासून विविध पोस्ट टाकण्यात आल्या. सुंदर पिचाई यांचे हे अकाऊंट त्यांच्या ट्विटर हॅंडलला जोडलेले असल्याने हॅकरकडून टाकण्यात आलेल्या पोस्ट पिचाई यांच्या ट्विटर हॅंडलवरही प्रसिद्ध झाल्या. हॅकींगची माहिती मिळताच लगेचच पिचाई यांच्या ट्विटर हॅंडलवरील त्या पोस्ट लगेचच हटविण्यात आल्या. पण हॅकिंगचे पुरावे देण्यासाठी याचे काही स्क्रिनशॉटही वेगवेगळ्या साईट्सवर प्रसिद्ध झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अवरमाईनमध्ये तीन सदस्य असून, त्यांच्याकडूनच हा कारभार केला जातो.

वेगवेगळ्या पद्धतीचा वापर सेलिब्रिटींचे विविध अकाऊंटचे पासवर्ड मिळवण्यासाठी केला जातो, असे या गटाने म्हटले आहे. ऑनलाईन विश्वासातील सुरक्षेच्या क्षेत्रातील आपले महत्त्व दाखवून देण्यासाठी अवरमाईनकडून हे प्रयत्न सुरू आहेत. ज्यांचे अकाऊंट हॅक केले जातात त्यांना अधिक सुरक्षिततेसाठी सर्वोतोपरी मदत करण्यास आपण तयार आहोत, असेही अवरमाईनच्या सदस्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment