प्लुटोवर बर्फाच्या कवचाखाली द्रवसागर असण्याची शक्यता

pluto
वॉशिंग्टन : नासाच्या न्यू होरायझन्स या अवकाश यानाने केलेल्या विश्लेषणात प्लुटो या बटू ग्रहावर बर्फाच्या कवचाखाली द्रवसागर असण्याची शक्यता वर्तवली आहे. गेल्या वर्षी प्लुटोजवळून न्यू होरायझन्स यानाने फेरी मारली होती तेव्हा या बटू ग्रहाबाबत अनेक दुवे मिळाले असून त्यात तेथे बर्फाखाली एके काळी द्रवसागर होता, असे निष्पन्न झाले आहे.

प्लुटोचे उत्क्रांती प्रारूप अमेरिकेच्या ब्राऊन विद्यापीठातील वैज्ञानिकांनी बदलले असून त्यात न्यू होरायझन्सने पाठविलेल्या माहितीचा वापर करण्यात आला आहे. जर तेथील महासागर गोठलेला असता तर संपूर्ण ग्रहच आक्रसला असता. प्लुटोच्या पृष्ठभागावर आक्रसल्याच्या कुठल्याही खुणा नाहीत असे संशोधकांचे मत आहे. याउलट न्यू होरायझन्सने प्लुटोच्या प्रसरणाच्या खुणा दाखविल्या आहेत.

कुईपर पट्ट्यात जाऊन प्लुटोच्या घेतलेल्या छायाचित्रात तो अवकाशातील बर्फाचा गोळा दिसतो. पाणी, नायटड्ढोजन व मिथेनचे बर्फ तिथे आहेत व तेथील पर्वत काही मीटर उंच असून हृदयाच्या आकाराची मोठी पठारे आहेत. तेथे सायन्स प्रस्तरभंग ४ किलोमीटर खोलीपर्यंत आहे. प्लुटोवर द्रवचा सागर असावा व प्रस्तरभंगाचे थर असावेत. न्यू होरायझन्सने दाखवल्यानुसार प्रस्तरभंगाचे गुणधर्म तेथे दिसतात. याचा अर्थ तेथे प्रसरण होत आहे, असे ब्राऊन विद्यापीठाच्या नोआ हॅमंड यांनी सांगितले.

उपस्तरातील सागरात नंतर द्रव गोठला व नंतर त्याचे प्रसरण झाले असावे, असे त्यांचे मत आहे. वैज्ञानिकांच्या मते प्लुटोच्या खडकातील गाभ्यात किरणोत्सारी मूलद्रव्ये उष्णता निर्माण करीत असावीत व त्यामुळे बर्फाचे कवच वितळत असावे. कुईपर पट्ट्यात नंतर हा वितळलेला भाग परत गोठला असावा व त्यातील बर्फ हे पाण्यापेक्षा कमी घन असावे त्यामुळे ते गोठताना प्रसरण झाले असावे. जर प्लुटोवर समुद्र असेल तर तो गोठलेला किंवा त्या अवस्थेला आलेला असेल. नवीन प्रारूपानुसार सौरमालेच्या टोकाला असलेल्या खगोलीय घटकात सागर असण्याची शक्यता आहे. ‘जिओफिजिकल रीसर्च लेटर्स’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

Leave a Comment