जेष्ठांनी रेल्वे तिकीट सवलत सोडावी यासाठी प्रयत्न

senior
सवलतींचे ओझे जड झालेल्या रेल्वेने त्यातून मुक्तता मिळविण्यासाठीचे पर्याय शोधले असल्याचे समजते. त्यानुसार रेल्वेतून प्रवास करताना जेष्ठ नागरिकांना आरक्षित वर्गात ज्या तिकीट सवलती दिल्या जातात, त्या सोडण्याचा पर्याय तिकीट खरेदी करतानाच मिळू शकणार आहे. त्यासाठी संबंधित तिकीटासाठी रेल्वेला प्रत्यक्षात किती खर्च आहे तो तिकीटावरच छापला जाणार आहे. त्यामुळे आपल्याला किती सवलत मिळते हे प्रवाशांना समजू शकणार आहे. गतवर्षात रेल्वेला सबसिडीमुळे १६०० कोटी रूपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रेल्वेकडून ५५ श्रेणी तील प्रवाशांसाठी तिकीटात सवलती दिल्या जातात. त्यात ५८ वर्षांपुढील महिलांना तिकीटात ५० ट्क्के तर ६० वर्षांपुढील पुरूष प्रवाशांना तिकीटात ४० टक्के सवलत दिली जाते. तिकीट घेताना वय लिहिले की या सबसिडीसहच किंमत आकारली जाते. त्या ऐवजी आता तिकीट घेताना आपण होऊन ही सबसिडी सोडण्याचा पर्याय प्रवाशांना दिला जाणार आहे.

जेष्ठ नागरिकांशिवाय अपंग, कॅन्सरचे रूग्ण, पुरस्कार विजेते खेळाडू, पदक विजेते सेनेतील सैनिक अशा अनेकांना तिकीटात सवलती दिल्या जातात. मात्र त्यातही सर्वाधिक म्हणजे सरासरी ११०० कोटी रूपये जेष्ठ तिकीट सवलतीपोटी जातात. त्यामुळे जेष्ठांना स्वतःहून ही सवलत नाकारली तरी रेल्वेच्या उत्पन्नात चांगली भर पडणार आहे. सवलत सोडण्याचा पर्याय तिकीटावर देण्यासाठी सॉफ्टवेअरमध्ये योग्य ते बदल केले गेले असल्याचेही सांगितले जात आहे.

Leave a Comment