भारतीय अर्थव्यवस्थेवर ‘ब्रेक्‍झिट’चा परिणाम होणार नाही – जेटली

arun-jaitley
नवी दिल्ली – भारतीय अर्थव्यवस्था ‘ब्रेक्‍झिट’मुळे काही काळासाठी निर्माण झालेल्या अस्थिरतेला सामोरे जाण्यासाठी सज्ज असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केली आहे.

५२ टक्के नागरिकांनी युरोपियन महासंघातील (ईयू) सदस्य सोडण्यासाठी घेण्यात आलेल्या मतदानात अनुकूलता दर्शविल्याने आता ब्रिटन युरोपियन महासंघामधून बाहेर पडणार आहे. या घटनेमुळे आंतराष्ट्रीय अर्थव्यवस्थेत गंभीर परिणाम दिसू लागले असून जेटली यांनी या पार्श्‍वभूमीवर एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे भारतीय अर्थव्यवस्था ‘ब्रेक्‍झिट’च्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी सज्ज असल्याचे म्हटले आहे. पुरेशी परकीय गंगाजळी देशात असून केंद्र आणि रिझर्व्ह बॅंक (आरबीआय) ‘ब्रेक्‍झिट’मुळे काही काळासाठी निर्माण झालेल्या अस्थिरतेचा योग्य सामना करण्यासाठी सक्षम आहेत, असा विश्‍वास जेटली यांनी व्यक्त केला आहे.

भारतावर ‘ब्रेक्‍झिट’चा झालेला परिणाम कमी करून अस्थिरता कमी करण्यावर भर दिला जाईल, असेही जेटली यांनी म्हटले आहे. तर रिझर्व्ह बँकेचे चलन विनियम बाजारासह सर्व बाजारांवर लक्ष आहे. गरज पडेल तेव्हा बाजारात तरलता उपलब्ध करुन दिली जाईल, अशा प्रतिक्रिया रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केल्या आहेत.

Leave a Comment