रनिंगसाठी शूज खरेदी करताना घ्या ही काळजी

shoes
आजकाल रनिंग करणार्‍यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झालेली दिसत आहेच पण लहान मुलांपासून ते महिला, मुलीवृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील लोक रनिंगमध्ये रूची घेत असल्याचे दिसून येत आहे. रनिंगसाठी चांगले बूट वापरणे हे पायाच्या आरोग्यासाठी आवश्यक असते. सर्वसाधारणपणे रनिंगसाठी बूट घेताना त्यांचे डिझाईन, किंमत व ब्रँड पाहिला जातो मात्र अनेक महत्त्वाच्या बाबी लक्षातही घेतल्या जात नाहीत. वैज्ञानिकांनी याबाबत सावधगिरीचा इशारा दिला आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपल्या पायाला योग्य ठरतील असेच शूज निवडले गेले पाहिजेत अन्यथा पायांना अपाय होण्याची मोठी शक्यता आहे. हे शूज खरेदी करताना कोणत्या बाबी ध्यानात घ्यायला हव्यात त्याची ही माहिती.

१)स्टॅबिलिटी – रनिंग शूज घेताना ते तळपायाच्या कमानीला सपेार्ट देणारे हवेत. त्यामुळे घोटा मुडपत नाही व पाय मुरगळण्याचा धोका कमी होतो.

२)कुशनिंग- पळताना रनरचे पायावर पडणारे वजन नऊपटीने वाढत असते. अशावेळी योग्य कुशनिंग असेल तर पळण्यामुळे फार दमणूक होत नाही व दीर्घ काळ पळता येते. पळताना रनरचे ४० टक्के वजन टाचांवर तर बाकीचे चवड्यावर येत असते. त्यामुळे चवड्यांच्या जागी चांगले कुशन हवेच.

३)लाईट वेट- दीर्घकाळ पळायचे असेल तर दमणूक कमी व्हावी यासाठी शूज वजनाला हलके हवेत. यामुळे पाय लवकर उचलला जातो.

feet
४)फ्लेक्सिबिलीटी- शूजचा पुढचा भाग लवचिक हवा. त्यामुळे पायाचा चवडा आरामात वाकू शकतो व वेगाने धावणे शक्य होते.

५)ग्रिप- धावताना जमीनीवरून पाय घसरत नाही ना याची काळजी घेणे आवश्यक असते. त्यामुळे शूजच्या बाहेरचे सोल रबर, थरमोप्लास्टीक रबरचे असणे गरजेचे. यामुळे पाणी अथवा तेल सांडलेले असेल तरी पाय घरसत नाहीत.

feet1
शूज खरेदी करताना आपला पाय कोणत्या प्रकारात मोडतो तेही लक्षात घ्यायला हवे. कांही जणांचा तळवा पूर्णपणे जमीनीला टेकतो त्याला फ्लॅट फूट म्हणतात. या लोकांनी रनिंगसाठी ऑर्थोटिक्स इनस्टर्ट घालून बूट वापरावेत. तसेच ज्यांच्या तळव्याची कमान जास्त असेल त्यांनी अंडर प्रोनेटर वापरावे. शूज बनविणार्‍या कंपन्या सर्वसाधारणपणे माणसाची तळव्याची कमान मध्यम धरून बूट बनवित असतात. अशावेळी फ्लॅट फूट अथवा जादा कमान वाल्या लोकांनी तळव्याला तसेच पुढच्या चवड्याला पूर्ण आधार देतील असे पॅडिंग वापरणे आवश्यक असते अन्यथा पायांना दुखापत होऊ शकते. पाय मुरगळू नयेत यासाठी फ्लेक्झिबल कुशनिंग असलेले अधिक चांगले.

Leave a Comment