भारतीय, तिबेटी व इस्त्रायली संस्कृतीचा सुंदर मेळ असलेले धरमशाला

dharamshala1
धौलाधार पर्वतरांगात वसलेले धरमशाला हे पर्यटन स्थळ सुंदर दर्‍या, धबधबे, बर्फाच्छादित पर्वतरांगा, चहाचे मळे, खळाखत वाहणारे झरे नाले यामुळे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहेच पण येथे जाणार्‍या पर्यटकांना भारतीय, तिबेटी तसेच इस्त्रायली संस्कृतीचे मनोहारी दर्शनही घडते. एप्रिल ते जून व आक्टोबर ते जानेवारी हा काळ येथे जाण्यासाठी अत्यंत चांगला मानला जातो. ट्रेकर्सचेही हे आवडते ट्रेकिंग डेस्टीनेशन आहे.

मुख्य गावापासून साधारण ९ किमीवर मक्लोडगंज हे ठिकाण असून तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांचे येथे निवासस्थान आहे. हे ठिकाण निवार्सित तिबेटी लोकांचे मुख्यालयही आहे व ते जगभरात प्रसिद्ध आहे. १९५९ साली दलाई लामा यांनी तिबेटमधून हजारो तिबेटींसह येथे भारत सरकारच्या आश्रयाखाली आपले स्वतंत्र ठाणे निर्माण केले आहे. याला मिनी ल्हासा असेही म्हटले जाते. येथील लामा टेंपल सुंदर आहेच पण दलाई लामांचा पॅलेसही देखणा आहे. लामा टेंपलमध्ये भली प्रचंड प्रार्थनाचक्रे आहेत. ही फिरवली की मंत्रपठण करण्याचे पुण्य लाभते अशी श्रद्धा आहे. येथील तिबेटी मार्केट अत्यंत आकर्षक आहे व येथेही पर्यटकांची खरेदीसाठी गर्दी होते.

dharamshala
जवळच असलेले भागसूनाग मंदिर सुंदर धबधबा आणि सरोवरासाठी पाहायलाच हवे असे. धर्मकोट गांव हे मिनी इस्त्रायल असून येथे मुख्यत्वे परदेशी व त्यातही इस्त्रायली पर्यटक मोठ्या संख्येने येतात. समुद्रसपाटीपासून २८४२ मीटर उंचीवर असलेले त्रियुंड हा जणू धरमशालेचा मुकुट मानला जातो. ट्रेक वेड्यांचे हे आवडते ठिकाण. त्याच्यापुढेच इंद्रहार ग्लेशियर असून येथेही ट्रेकर्स मोठ्या संख्येने भेट देतात.

१८५२ साली बांधलेले दाट झाडीतील सेंट जॉर्ज चर्चची भेट चुकवू नये अशी. देवदाराच्या दाट वनात हे ठिकाण आहे. नड्डी गावाजवळील कांगडा येथे क्रिकेटचे स्टेडियम असून पहाडातल्या या स्टेडिअमवर आयपीएल सह अनेक सामने खेळले जातात.

Leave a Comment