स्टार्ट अप्सचे आशादायी विश्‍व

startup
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आवडती योजना म्हणून स्टार्ट अप् इंडिया या उपक्रमाकडे पाहिले जाते आणि देशातल्या तरुण उद्योजकांनीही यासंबंधातल्या नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला तसेच सादाला उत्तम प्रतिसाद दिलेला आहे. बंगळुरु येथील गेटवे हाऊसचे संस्थापक मोहनदास पै यांनी या संबंधात बोलताना स्टार्ट अप् उद्योगांमुळे देशाचे चित्र बदलून जाईल अशी आशा व्यक्त केली. श्री. पै हे इन्फोसिसचे बडे अधिकारी होते आणि आता त्यांनी स्टार्ट अप् उद्योगांना प्रेरणा देणारी गेटवे हाऊस ही संस्था स्थापन केली आहे. भारतात सध्या स्टार्ट अप् इंडिया या योजनेखाली २० हजार उद्योग सुरू झाले असून त्यांनी ८० अब्ज डॉलर्स एवढी संपत्ती निर्माण केली आहे असे पै यांनी सांगितले.

स्टार्ट अप् इंडिया उपक्रमामध्ये नवे उद्योजक धडपड करत राहतात. मात्र ते अशी धडपड एकट्याने करत नाहीत. साधारण ज्यांच्या कुटुंबामध्ये नोकरीला पर्याय नाही असे मानले जाते. अशी मुले काही तरी औद्योगिक धाडस करण्याचे विचार करायला लागतात. मात्र असा उद्योग उभारण्याची आपली एकट्याची ताकद नाही हे त्यांच्या लक्षात येते म्हणून दोघे किंवा तिघे समानधर्मी तरुण एकत्र येऊनच असे धाडस करत असतात. सध्या भारतामध्ये ५५ ते ६० हजार तरुण उद्योजक स्टार्ट अप् इंडिया उपक्रमात सहभागी झाले आहेत.

अजून या उपक्रमाचा म्हणावा तसा गवगवा झालेला नाही. पण येत्या दहा वर्षात तो निश्‍चितपणे होईल. आता सुरू असलेल्या उद्योगातून ३ लाख ५० हजार रोजगार निर्माण झालेले आहेत. पण दहा वर्षानंतर उद्योगांची संख्या एक लाखावर जाईल. त्यात ५०० अब्ज डॉलर्सची उलाढाल होईल आणि ३५ लाख तरुणांना नोकर्‍या मिळतील असा विश्‍वास पै यांनी व्यक्त केला. कारण तरुणांना या उपक्रमाचे महत्त्व लक्षात यायला लागले आहे. गेल्या एकाच वर्षामध्ये ५ हजार नवे उद्योग सुरू झाले आणि त्यातील १२०० उद्योगांना निधीसुध्दा मिळाला. उर्वरित उद्योगांना निधी मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे. स्टार्ट अप् इंडिया उपक्रमातील उद्योग हे मोठ्या संख्येने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले आहेत आणि त्यांच्यामुळे देशातल्या अन्य उद्योगांचे अनेक प्रश्‍न सुटणार आहेत. म्हणजे स्टार्ट अप् इंडिया हा उपक्रम सगळ्या उद्योग विश्‍वाला फायदेशीर ठरणारा आहे. त्याच्यामुळे देशात किती मोठा बदल झाला हे २० वर्षांनंतर दिसणार आहे असे ते म्हणाले.

Leave a Comment