नेक्स्टबिट रॉबिन स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी कपात

nextbit
मुंबई : क्लाऊड स्टोरेज असणारा नेक्स्टबिट रॉबिन स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली असून या स्मार्टफोनची किंमत १०० डॉलरने (६ हजार ५००रुपये) कमी करण्यात आली आहे. आधी ही कपात भारतातील आणि अमेरिकेतील ग्राहकांसाठी होती. मात्र, कोणत्याही विशिष्ट देशातील ग्राहकांसाठी ही कपात नसल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे जगभरातील सर्व ग्राहकांना नेक्स्टबिट रॉबिन स्मार्टफोन २९९ डॉलरना (जवळपास २० हजार रुपये) उपलब्ध असणार आहे.

गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात नेक्स्टबिट रॉबिन स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला होता. लॉन्चिंगवेळी ३९९ डॉलर (जवळपास २६ हजार रुपये) या स्मार्टफोनची किंमत होती. आता थेट १०० डॉलर म्हणजेच जवळपास ६५०० रुपयांची कपात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या नव्या किंमतीत या स्मार्टफोनची फ्री शिपिंग सुविधाही उपलब्ध आहे. अनोख्या डिझाईन्सशिवाय रॉबिन स्मार्टफोनमध्ये यूझर्सना ३२ जीबी इनबिल्ट स्टोरेज आणि १०० जीबीपर्यंत क्लाऊड स्टोरेजही देण्यात येते.

Leave a Comment