जुन्या घड्याळांचा संग्रहही ठरू शकतो फायदेशीर

clock
लोकांना अनेक वस्तूंचा संग्रह करण्याची आवड असते. विविध प्रकारच्या कारपासून ते अगदी विविध प्रकारच्या की चेन पर्यंत अनेक वस्तूंचा संग्रह लोक करतात व त्याचा अभिमानही बाळगतात. जुन्या घड्याळांचा संग्रह करणारेही कांही उत्साही आहेत आणि विशेष म्हणजे जुन्या पुराण्या घड्याळात केलेली ही गुंतवणुक अनेकदा फायदेशीर ठरत असल्याचा अनुभवही त्यांना येतो आहे. शेवटी घड्याळे कितीही मौल्यवान असली तरी ती वेळच दाखविणार असा मागास विचार येथे उपयोगाचा ठरत नाही कारण जुन्या घड्याळांच्या खरेदीविक्रीचा कारभार अब्जावधी रूपयांचा आहे हे कदाचित आपल्याला माहिती नसेल.

clock1
पॅट्रीक फिलिप यांचे एक जुने घड्याळ काही काळापूर्वी विक्रमी किंमतीला लिलावात विकले गेले आहे. या घड्याळाला तब्बल दीड कोटी अमेरिकन डॉलर्स इतकी किंमत मिळाली. सिंगापूरचे डॉ.बर्नाड चांग असेच जुन्या घड्याळांचे संग्राहक आहेत. ते सांगतात वयाच्या १५ व्या वर्षापासून मी घड्याळे जमवितो आहे. आजपर्यंत त्यांच्याकडे शेकडो घड्याळे जमली आहेत. त्यासाठी त्यांनी जसे कोट्यावधी रूपये खर्च केले आहेत तसेच काही घड्याळांच्या विक्रीतून कोट्यावधी रूपये कमावलेही आहेत.

चांग यांच्या मते तुमच्यावर घड्याळे विक्रीचा दबाव नसेल तर घड्याळांचा संग्रह हा सुरक्षित सौदा आहे. गेल्या दशकांत व्हिेंटेज घड्याळांच्या किमतीत ६८ टकके वाढ झाली आहे. व्हिंटेज म्हणजे जुनी पण स्वतःची कांही खास खूबी असलेली. या क्षेत्रातील तज्ञ सु जिआ मात्र या संदर्भात एक इशारा देतात. ते म्हणतात, जुनी घड्याळे घेताना घड्याळांबाबत माहिती असणार्‍याने ती खरेदी करावीत. घड्याळ्यासंदर्भातले ज्ञान असेल तर अशी खरेदी नक्कीच फायदेशीर ठरते.

Leave a Comment