गव्हर्नरपदासाठी खेळ मांडला!

combo
नवी दिल्ली : सप्टेंबरमध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे विद्यमान गव्हर्नर रघुराम राजन यांचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्यामुळे आता त्यांची जागा कोण घेणार, याची चर्चा आता रंगू लागली असून, यासाठी सध्या सात जणांची नावे चर्चेत आहेत. मात्र, यामध्ये दोन प्रबळ दावेदार मानले जात असून, अरुंधती भट्टाचार्य आणि ऊर्जित पटेल अशी त्यांची नावे आहेत.

देशाच्या मध्यवर्ती बँकेचे विद्यमान गव्हर्नर रघुराम राजन यांच्याकडून आलेल्या दुस-या टर्मच्या नकारानंतर त्यांची रिक्त जागा कोण भरून काढणार या चर्चेला जोर चढला आहे. राजन यांच्या स्पष्ट नकारानंतर या जागेसाठी इच्छुकांमधील स्पर्धा अधिकच सोपी झाली आहे. रिझव्र्ह बँकेच्या गव्हर्नरपदाच्या शर्यतीत तसे तर सात जणांनी रस दाखविलेला आहे. मात्र त्यातही स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य आणि रिझव्र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर ऊर्जित पटेल या दोघांची नावे आघाडीवर आहेत. ४ सप्टेंबर २०१६ रोजी राजन यांचा गव्हर्नरपदाचा कार्यकाल संपुष्टात येत असून राजन यांनी शिकागो विद्यापीठात परतण्याचा निर्धार आपल्या सहका-यांना लिहिलेल्या पत्रात शनिवारी स्पष्ट केल्यानंतर सरकारला तत्पूर्वीच ही जबाबदारी समर्थ अशा खांद्यावर सोपविणे अनिवार्य बनले आहे. दरम्यान रविवारी सरकारने या पदासाठी आता राजन यांच्या तोडीच्या व्यक्तीवरच ही जबाबदारी सोपविण्याचा मानस व्यक्त केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्कील इंडिया, मेक इन इंडिया या योजनांना साकार करण्याचे धाडस अंगी असलेल्या, अर्थशास्त्रातील उच्चपदस्थ व्यक्ती शोधण्याची मोहीम सुरू असल्याचे केंद्र सरकारच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळेच या पदासाठी देव पाण्यात घालून बसलेल्यांमध्ये आता अधिक उत्सुकता लागून राहिली आहे. गव्हर्नरपदासाठी सध्या प्रामुख्याने सात जण स्पर्धेत आहेत. आरबीआयचा नवा गव्हर्नर कोण असेल हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. राजन यांनी २०१३ मध्ये २३ वे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारला होता. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी लवकरच राजन यांच्या उत्तराधिका-याची निवड होईल, असे म्हटले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या पदासाठी सर्वांत आघाडीवर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रमुख अरुंधती भट्टाचार्य आहेत. भारतातील सर्वांत मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकर म्हणून भट्टाचार्य प्रख्यात असून २०१५ आणि २०१६ अशा सलग दोन्ही वर्षी फोब्र्जच्या शक्तिशाली महिलांच्या यादीत भट्टाचार्य यांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला आहे.

त्यांच्यानंतर या जबाबदारीचे संभाव्य दावेदार आहेत ते आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर ऊर्जित पटेल. २०१३ सालापासून ते भारताच्या नाणेनिधी धोरण विभागाची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत. विद्यमान गव्हर्नर रघुराम राजन यांच्या अत्यंत निकटवर्तीय समजले जाणा-या पटेल यांनी येल विद्यापीठातून अर्थशास्त्राची डॉ़क्टरेट केलेली असून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसाठी कामही केलेले आहे. या दोन प्रबळ दावेदारांशिवाय संभाव्य गव्हर्नरपदाच्या स्पर्धेत अर्थतज्ज्ञ विजय केळकर, राकेश मोहन, अशोक लाहिडी, सुबीर गोकर्ण आणि अशोक चावला यांचीही नावे चर्चेत आहेत. मात्र या सात जणांपैकी अरुंधती भट्टाचार्य, ऊर्जित पटेल यांच्याचपैकी एकाची या पदावर वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.

Leave a Comment