दुसऱ्यांदा गव्हर्नर पद स्वीकारणार नाही : रघुराम राजन

raghuram-rajan
नवी दिल्ली : सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) गव्हर्नरपदाची दुसरी टर्म देऊ केली, तरी स्वीकारणार नसल्याचे आरबीआयचे विद्यमान गव्हर्नर रघुराम राजन यांनी स्पष्ट केले आहे. राजन यांचा कार्यकाळ येत्या ४ सप्टेंबर २०१६ रोजी संपत आहे. भाजप नेत्यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांची पार्श्वभूमी रघुराम राजन यांच्या या निर्णयाला असल्याची चर्चा आहे. आरबीआयच्या गव्हर्नरपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर शिक्षण क्षेत्रात परतणार असल्याचे रघुराम राजन यांनी सांगितले. देशाला जेव्हा माझी गरज असेल, तेव्हा मी मदतीसाठी तयार असेन, असेही राजन म्हणाले.

रघुराम राजन यांनी याआधीही अनेकदा शिक्षण क्षेत्रात परतण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, आता त्यांनी स्पष्टपणे निर्णय जाहीर केला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून रघुराम राजन यांच्याविरोधात भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी टीकेची झोड उठवली आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ज्या पद्धतीने व्याज दरांमध्ये कपात करण्याची गरज होती, ते राजन यांनी केली नाही, असा आरोप स्वामी यांनी केला होता.

Leave a Comment