रागावरही प्रेम करायला शिका

anger
मराठीमध्ये एक म्हण आहे. ‘रागं रागं भिक मागं’. या म्हणीमध्ये फार खोल अर्थ सामावलेला आहे. जो माणूस सतत रागात असतो त्याचे रागामुळे किती प्रकारचे नुकसान होत असते याचा विचार केला असता ही म्हण किती समर्पक आहे याचे प्रत्यंतर येते. जो माणूस सतत रागाने बोलतो त्याच्या शरीरावर त्याचे परिणाम होतात. म्हणजे रक्तप्रवाह मेंदूकडे वेगाने धावायला लागतो. काही लोक तर हा रक्तप्रवाह असह्य झाला तर चक्कर येऊन पडतात. म्हणजे रागाचे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. त्याशिवाय आपण रागाने ज्या माणसाशी बोलतो त्या माणसाशी असलेले संबंध बिघडतात. म्हणजे आरोग्याबरोबर नातेसंबंधांचेही नुकसान होते. एखाद्या व्यवसायात किंवा नोकरीत आपले यश किंवा अपयश हे आपल्या संबंधांवर आधारित असतात आणि आपले सर्वांशी असलेले संबंध असे रागामुळे बिघडत असतील तर आपण व्यवसायातसुध्दा अपयशी ठरू शकतो आणि व्यवसाय अपयशी ठरला की आपल्याला भीक मागण्याशिवाय पर्याय राहत नाही. म्हणून ज्या कोण्या शहाण्या माणसाने ही म्हण तयार केली असेल त्याला सलामच केला पाहिजे.

हा सलाम करतानासुध्दा रागात नव्हे तर आनंदाने सलाम केला पाहिजे आणि त्या म्हणीतून आपण काय बोध घेऊ शकतो याचा विचार केला पाहिजे. अर्थात कितीही विचार केला तरी राग आवरला पाहिजे याला काही पर्याय नाही. म्हणूनच राग आवरण्यासाठी काय केले पाहिजे याचे तंत्र अवगत केले पाहिजे. १. आपण अनपेक्षितपणे रागाला येतो आणि भावनेच्या भरात कोणाला तरी रागाने बोलून जातो. यावेळी आपल्या मेंदूत होणारी प्रक्रिया आपल्या नकळत घडत असते आणि रागाने बोलून गेल्यानंतर आपल्याला त्या रागाची जाणीव होते. तेव्हा अनपेक्षितपणे जरी राग येत असला तरी आपल्याला कोणत्या गोष्टी घडल्या म्हणजे राग येतो याचा एक ठोकताळा आपल्या मनाशी निश्‍चित केला पाहिजे. एखाद्या शिक्षकाला वर्गात मुले उशिरा आली की राग येतो. अशा वेळी त्याने मुले वर्गात येण्याच्या आधीच आता आपण फार रागाला यायचे नाही असा आपल्या मनाशी निर्धार केला पाहिजे.

२. शांत व्हा. असा राग येणार याचा अंदाज आला की मनाला शांत करा. हे सांगतो तेवढे सोपे नाही. परंतु मनाचा निर्धार केला तर असे शांत होणे शक्य आहे. राग येताना आपल्या शरीरात होणारे बदल कसे असणार याचे निरीक्षण करा. रागाचा स्फोट होण्याआधी आपल्या डोक्यात काय विचार येतात याचा एक ट्रेंड असतो. तो विचारात घ्या आणि डोक्यात तसे विचार यायला लागले की मन शांत करायला लागा. वर्गात मुले उशिरा येतात म्हणजे ती बेशिस्तच असतात असे नाही. त्यामागे काही कारणेही असू शकतात तेव्हा ती समजून घेतली पाहिजेत असे आपल्या मनाला समजवा. दुसरी गोष्ट म्हणजे मुलांवर राग राग केल्याने मुलांची उशिरा येण्याची सवय सुटणार नाही. याचेही आकलन करा. ३. विचारांना वळण द्या. आपण दिवसभरामध्ये कितीवेळा रागाला येतो आणि कोणकोणत्या कारणांनी रागाला येतो याचे निरीक्षण करा आणि त्या त्या कारणांमागे असलेल्या आपल्या विचारांचा आढावा घ्या. एकदा तो आढावा घेतला की ते विचार बरोबर आहेत की चुकीचे आहेत याचे आपल्या मनाशी गणित मांडा आणि त्या मार्गाने राग आवरायला शिका.

४. रागाचा विधायक वापर. माणसाला राग आला की त्या क्षणाला त्याच्या मेंदूमध्ये असे काही स्राव द्रवत असतात की त्यांच्या द्रवण्याने मेंदूवरचा विवेकाचा ताबा सुटत असतो आणि ताबा नसलेल्या अवस्थेत तो काहीतरी बोलून जातो. असे रागाचे झटके आपल्याला आले की ते येऊ द्या. पण ते येऊन गेल्यानंतर डोके ठिकाणावर येते. असे डोके ठिकाणावर आल्यानंतर आपण थोडेसे विवेकशील होतो. या अवस्थेतल्या आपल्या विचारांचा आढावा नीटपणे घ्या आणि ही अवस्था आपल्याला दिवसातून जास्त वेळा कशी भोगता येईल याचा प्रयत्न करा. याचाच अर्थ राग येऊ द्या काय व्हायचे ते होऊ द्या परंतु नंतर विचार करून रागाचा विधायक वापर करा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment