देशात उभारणार ‘पेट्रोकेमिकल हब’ : अनंत कुमार

Petro-chemical
मुंबई: देशात लवकरंच केमिकल आणि पेट्रोकेमिकल हबची स्थापना करण्यात येईल; अशी घोषणा केंद्रीय रसायन आणि खते मंत्री अनंत कुमार यांनी केली. सध्या देशात २२ रासायनिक शुद्धीकरण प्रकल्प असून त्यातील निवडक ५ शुध्दीकरण प्रकल्पाभोवती हा केमिकल आणि पेट्रोकेमिकल हब स्थापन करण्यात येईल. या ‘पीसीपीआयआर’च्या कार्याला गती देण्यासाठी एका सुकाणू समितीची स्थापनाही करणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

भारत केम २०१६ च्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम रसायने आणि पेट्रोरसायने मंत्रालय तसेच फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीज (फिक्की) यांनी आयोजित केला.
इंडिया केम २०१६ च्या १ ते ३ सप्टेंबरदरम्यान बॉम्बे एक्झिबिशन सेंटर गोरेगांव मुंबई येथे होणाऱ्या या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश ‘मेक इन इंडिया’ला प्रोत्साहन देणे आणि भारतात गुंतवणुकीच्या शक्यता वाढविणे हे आहे.

यावेळी बोलतांना अनंत कुमार म्हणाले की, भारताचा रासायनिक उद्योग हा जगात सहाव्या क्रमांकावर असून आशियात तिसऱ्या क्रमांकावर आहे. परंतु आपल्याला पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करावे लागतील. या क्षेत्राची वृद्धी पायाभूत पर्यावरण आणि लॉजिस्टीकशी संबंधित असल्याने गेल्या दोन वर्षात जवळपास ५० अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यात आली आहे. आसाममध्ये बीपीसीएल स्थापन झाली असून आता डिसेंबरमध्ये कोच्ची इथे स्थापन होईल; असेही ते म्हणाले.

मानवी संसाधनांच्या संबंधात बोलतांना अनंत कुमार म्हणाले की, वाढत्या रसायने आणि पेट्रो रसायनांच्या गरजा लक्षात घेता कौशल्य अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञांची, कामगारांची गरज असल्याने त्यांचे मंत्रालय रासायनिक अभियांत्रिकी, विशेष संस्था स्थापन करणार आहे. तसेच प्लास्टीक रसायने आणि पेट्रोरसायने संस्थेची सुध्दा स्थापना करण्यात येईल. ज्यामुळे जवळपास १ लाख अभियंते आणि तंत्रज्ञ दरवर्षी उपलबध होतील.

Leave a Comment