त्रिशुळावर विराजमान वडक्कुमनाथ मंदिर

trissur
केरळ ही देवभूमी म्हणून ओळखली जाते. केरळच्या त्रिसूर शहरात वसलेले वडक्कुमनाथ मंदिर हे भगवान शिवाचे मंदिर जगभरात प्रसिद्ध असून येथे आद्य शंकराचार्यांच्या मातापित्यानी अपत्यप्राप्तीसाठी उपासना केली होती असे सांगितले जाते.

या मंदिराचे उल्लेख पौराणिक काळापासून येतात. हे महाभारत कालीन मंदिर शंकराच्या त्रिशुळावर विराजमान असल्याचेही सांगितले जाते. त्यावरूच गावाचे नांव त्रिसूर असे पडले आहे. कोणेएके काळी या मंदिराच्या ६० एकर परिसरात सागाचे दाट जंगल होते. कोचीनचा महाराजा राम वर्मा ( १७९० ते १८०५) याने त्रिसूर हे राजधानीचे शहर केले. शहराच्या मध्यात ९ एकर परिसरात तटबंदी केली गेली व त्यात विशाल शिवमंदिर निर्माण केले गेले. केरळच्या पारंपारिक वास्तूशैलीचा उत्तम नमुना असलेल्या या मंदिराला चार भव्य गोपुरे आहेत. मंदिर परिसरात भगवान शंकराबरोबरच शंकराचार्य आणि भगवान राम यांचीही मंदिरे आहेत.

या मंदिरात दरवर्षी आनपुरम उत्सवाचे आयेाजन केले जाते. ते पाहण्यासाठी देश विदेशातून लक्षावधी पर्यटक व भाविक येत असतात. यात हत्तींसाठी मेजवानी दिली जाते. त्याची सुरवात सर्वात लहान हत्तीपासून होते. हत्तींना या मेजवानीत गूळ, तूप, हळद घालून केलेले भात, नारळ, उस, केळी, काकडी यांची मेजवानी दिली जाते. एप्रिल मे दरम्यान हा उत्सव होतो.

येथेच जवळ मूळस्थलम म्हणूनही एक जागा आहे. त्याचा इतिहास असा सांगितला जातो की भगवान परशुरामाच्या विनंतीवरून येथे येताना शंकर महादेव कांही काळ या जागेवर थांबले होते. तेथे आता विशाल वटवृक्षाखाली ही जागा आहे. युनेस्कोने या मंदिराला जुन्या परंपरा, वास्तू शास्त्र व संरक्षण तंत्रानी युक्त असल्याबद्दल पुरस्कारही दिला आहे.

Leave a Comment