उच्च शिक्षणाच्या नव्या वाटा

education
दहावीचे निकाल लागले आहेत. बारावीच्याही निकालाला बरेच दिवस झाले असून त्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी उच्च शिक्षणाच्या नव्या वाटा शोधत आहेत. आपल्या देशात अजूनही उच्च शिक्षणाच्या वाटांच्या बाबतीत म्हणावे तसे शास्त्रशुध्द मार्गदर्शन केले जात नाही. साधारणपणे डॉक्टर, इंजिनिअर होणे याला अवास्तव महत्त्व दिले जाते आणि बहुसंख्य मुलांचे पालक त्यांच्यावर डॉक्टर किंवा इंजिनिअर होण्याचा भार टाकत असतात. त्यातल्या बर्‍याच पालकांना स्वतःला डॉक्टर किंवा इंजिनिअर होण्याची इच्छा असते पण होता आलेले नसते. म्हणून ते आपली अपुरी इच्छा मुलांवर लादत असतात आणि ही मुले आपल्या आईवडिलांच्या अपुर्‍या इच्छांचे वाहक झालेले असतात. त्या अपेक्षांचे ओझे घेऊन शिकताना त्यांना शिक्षण म्हणजे शिक्षा वाटत असते आणि पालकांच्या अपेक्षा पूर्ण करता आल्या नाहीत की अशी मुले आत्महत्या तरी करतात किंवा जी मुले आत्महत्या करत नाहीत ती मुले जन्मभर निराशेने भरलेले जीवन जगत राहतात. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांवर असे आपल्या अपेक्षांचे ओझे लादू नये आणि त्यांनी कोणते उच्चशिक्षण घ्यावे याचा निर्णय त्यालाच करू द्यावा असा एक प्रवाह आहे.

हा प्रवाह सकृतदर्शनी योग्य वाटत असला तरी तोही परिपूर्ण नाही. कारण मुलांना तरी स्वतःच्या भवितव्याचे निर्णय म्हणावे तेवढे परिपक्वपणे घेता येत नसतात. त्याचा कल किंवा आवड विचारात घेतली पाहिजे ही गोष्ट खरी आहे. परंतु आवड विचारात घेताना त्याच्या उच्च शिक्षणाचा निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य त्याला देणे कितपत योग्य ठरेल असाही प्रश्‍न उद्भवतो. साधारणपणे मुलांच्या मनाचा कानोसा घेतला तर असे लक्षात येते की ती मुलेसुध्दा फार विचारपूर्वक विद्याशाखेचा निर्णय करत नसतात. बहुसंख्य मुले आपले मित्र ज्या कॉलेजला जातात त्या कॉलेजला जाण्याकडे कललेले असतात. एखादा मुलगा त्याचा मित्र आहे याचा अर्थ दोघांच्याही आकलनाचा आणि आवडीचा शैक्षणिक विषय सारखाच आहे असा होत नाही. म्हणूनच केवळ आपले मित्र जाताहेत त्याच कॉलेजला जाण्याकडे कललेल्या अशा मुलांना उच्च शिक्षणाची त्याची शाखा निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देणे चूक ठरेल. यात पालकांचाही विचार महत्त्वाचा असावा. विद्यार्थ्यांचेही मत महत्त्वाचे मानावे पण त्याच सोबत बालपणापासून त्याच्या अभ्यासावर लक्ष देणार्‍या शिक्षकांचेही मत विचारात घ्यावे. अर्थात अशा शिक्षकाला उच्च शिक्षणाची निवड करण्याबाबत आवश्यक तेवढी अत्यधुनिक माहिती आहे की नाही याची खातरजमा करूनच शिक्षकांचेही मत विचारात घ्यावे.

विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा निर्णय पालक, विद्यार्थी आणि शिक्षक या तिघांचाही निर्णय असावा पण त्याला तज्ञ व्यवसाय मार्गदर्शकाचाही सल्ला जोडलेला असावा. सुदैवाने असा व्यवसाय करणारे लोक आता समाजात मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत आणि त्यांच्याकडे उच्च शिक्षणाच्या नवनव्या वाटांची अद्ययावत माहिती असते. उच्च शिक्षणाची योग्य निवड करणे हे तसे कौशल्याचे काम आहे आणि त्यासाठी फार मोठा तज्ञ असण्याची गरज आहेच असे नाही. पालकसुध्दा थोडे जागरूक राहिले तर तेसुध्दा याबाबत आपल्या मुलांना योग्य ते मार्गदर्शन करू शकतात. विविध वृत्तपत्रांमध्ये सातत्याने व्यवसाय मार्गदर्शनाची माहिती तपशिलात प्रसिध्द होत असते. विशेषतः एप्रिल, मे महिन्यापासून कितीतरी विद्याशाखांची माहिती, त्या विद्याशाखांचे शिक्षण देणार्‍या शिक्षणसंस्थांचे पत्ते अशी सविस्तर माहिती प्रसिध्द होत असते. अशी माहिती वाचत गेले तरी कितीतरी नवनवे व्यवसाय आणि त्यांचे शिक्षण यांची माहिती आपल्याकडे संकलित होऊ शकते आणि आपल्या मुलांचा विचार करून त्यातल्या एखाद्या विद्याशाखेची निवड आपण करू शकतो.

काही विशिष्ट व्यवसाय आणि शिक्षण यांच्याच भोवती फिरणार्‍या पालकांनाही एक गोष्ट सांगाविशी वाटते की डॉक्टर किंवा इंजिनिअर होणे म्हणजेच आयुष्याचे कल्याण या भ्रमातून त्यांना बाहेर यावे लागेल. कारण आपल्या देशामध्ये बेकारीचे स्वरूप फार विचित्र आहे. एखादे विशिष्ट शिक्षण घेतलेले करोडो विद्यार्थी बेकार बसलेले आहेत. तिकडे उमेदवार भरपूर पण जागा कमी आहे आणि दुसर्‍या बाजूला काही विशिष्ट व्यवसायांमध्ये जागा भरपूर पण उमेदवार कमी अशी विपरित स्थिती निर्माण झालेली आहे. याचे कारण ही जी नवीन क्षेत्रे उदयाला येत असतात त्यांच्या विषयी मुलांनाही काही माहिती नसते आणि पालकांनाही त्यांचा काही गंध नसतो. त्या क्षेत्रामध्ये माणसांची गरज निर्माण होत असते तेव्हा शिक्षण घेतलेली मुले उपलब्धच नसतात. त्यामुळे तिकडे माणसांची चणचण जाणवते. तेव्हा नव्याने उदयाला येत असलेली क्षेत्रे विचारात घेऊन त्या क्षेत्रांचे शिक्षण आपल्या मुलांना दिले पाहिजे. आता आपल्या देशामध्ये सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, अंतराळ संशोधन, माहिती तंत्रज्ञान, नॅनो टेक्नॉलॉजी, अन्न प्रक्रिया उद्योग, कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, पेट्रोल टेक्नॉलॉजी, जेनेटिकल इंजिनिअरिंग या नवनव्या क्षेत्रांचे महत्त्व वाढत चालले आहे. या क्षेत्रात शिक्षण घेतल्यानंतर मुलांच्या नोकर्‍यांचे प्रश्‍न निर्माण होणार नाहीत. तेव्हा या दिशेने मुलांना नेले पाहिजे.

Leave a Comment