मान्सूनचे संशोधन करणार समुद्री रोबो !

robot
लंडन : मान्सूनच्या पावसावरच भारत आणि इतरही अनेक देशांचे समाजजीवन, अर्थकारण अवलंबून असून सतत दोन वर्षे भारतात मान्सूनने हुलकावणी दिल्याने अनेक राज्यांत दुष्काळी परिस्थिती आहे. मान्सून यंदाही सुरळीत झालेला नसल्याने शेतक-यांत चिंतेचे वातावरण असल्यामुळेच मान्सूनचा अचूक अंदाज व्यक्त करणारे मॉडेल भारतासाठी अत्यंत आवश्यक आहे.

इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट अँजेलिया, युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंग आणि भारतीय शास्त्रज्ञांनी एकत्र येत यासाठी बंगालच्या उपसागरात संशोधन प्रकल्प हाती घेतला आहे. यामध्ये समुद्रात अत्याधुनिक रोबो सोडण्यात येणार आहेत. हे रोबो मान्सूनच्या आगमनावेळी समुद्राच्या आतील परिस्थितीच्या नोंदी घेतील. तर याच वेळी संशोधनासाठी वापरली जाणारी विमाने वातावरणातील नोंदीही घेतील. मान्सूनच्या आगमनावेळी समुद्राच्या आत काय परिस्थिती असते आणि समुद्राच्या वर काय परिस्थिती असते याचा सविस्तर अभ्यास करून मान्सूनवर त्याचा काय परिणाम होतो, याचा अभ्यास हे संशोधक करणार आहेत.

युनिव्हर्सिटी ऑफ अँजेलियाच्या वेबसाईटवर या प्रकल्पाची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या अभ्यासातून भविष्यात मान्सूनच्या आगमनाचा अचूक अंदाज व्यक्त करता येण्यासाठी मॉडेल निर्माण करता येणार आहे. प्रा. अँड्रीएन मॅथ्यू यांच्या नेतृत्वाखाली हा संशोधन प्रकल्प राबवला जाणार आहे. मान्सूनची निर्मिती ही फारच किचकट प्रक्रिया असल्याने त्याचा अंदाज वर्तवणे ही कठीण बाब आहे.

मान्सूनची निर्मिती हीच बाब अजून पूर्णपणे समजू शकलेली नाही. समुद्री आणि त्यावरील वातावरण यांचा एकत्र अभ्यास करणे यासाठी आवश्यक वाटते,’ असे ते म्हणाले. नॅशनल ओशिएनोग्राफी सेंटर, इंडियन नॅशनल सेंटर फॉर क्लायमेट इन्फर्मेशन सव्र्हिस, द नॅशनल सेंटर फॉर मेडिएम रेंज वेदर फोरकास्टिंग या संस्थाही यात सहभागी आहेत.

Leave a Comment