विदर्भात ४०० कोटींचा प्रकल्प उभारणार अमूल

amul
नवी दिल्ली – डेअरी क्षेत्रातील आघाडीची असलेली अमूल कंपनी दुष्काळ आणि शेतकर्‍यांच्या आत्महत्यांनी ग्रासलेल्या विदर्भात सुमारे ४०० कोटी रुपयांचा प्रकल्प उभारणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

विदर्भात एखादा मोठा डेअरी प्रकल्प शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सुरू करण्याची विनंती आम्ही अमूलला केली आणि ४०० कोटी रुपयांचा प्रकल्प आणण्याचे कंपनीने मान्य केले असून विदर्भातील शेतकरी अमूलच्या सहकार्यामुळे आपल्या दुग्धजन्य उत्पादनात चार ते पाच पटीने वाढ करणार आहेत, असे नागपूरचे खासदार असलेले नितीन गडकरी यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

महाराष्ट्रातील सुमारे ७५ टक्के वनजमीन असलेल्या विदर्भात डेअरी व्यवसाय मात्र यशस्वीपणे उभा राहू शकला नाही. त्या तुलनेत पश्‍चिम महाराष्ट्रातीर कोल्हापूर जिल्हा बराच आघाडीवर आहे, याकडे गडकरी यांनी लक्ष वेधले. अमूल कंपनीने अलीकडेच जळगाव येथे आपल्या प्रकल्पाचा आढावा घेतला आहे आणि आता ही कंपनी विदर्भात येत आहे. यामुळे बेरोजगारांना रोजगार तर मिळेलच, शेतकर्‍यांनाही पर्यायी व्यवसाय प्राप्त होणार आहे, असे गडकरी म्हणाले.

Leave a Comment