येथे देवाबरोबर पुजला जातो दानवही

paithani
उत्तराखंड मधील कोटद्वार पासून सुमारे १५० किलोमीटर अंतरावर जगातले एक अद्भूत देवालय आहे. पैठाणी गावातील या मंदिरात भगवान शंकरासह दानव राहू याचीही पूजा केली जाते. जगातील हे राहूचे एकमेव मंदिर असल्याचेही सांगितले जाते. नदी संगमावर वसलेले हे मंदिर अतिशय प्राचीन आहे.

या संदर्भात अशी कथा सांगितली जाते की जेव्हा समुद्रमंथन केले गेले तेव्हा त्यातून निघालेले अमृत राहू दानवाने देवाचे रूप घेऊन प्राशन केले. यामुळे राहूला अमरत्व प्राप्त होण्याची संधी आली पण देवांच्या हे लक्षात येताच श्रीविष्णुंनी त्यांच्या सुदर्शनचक्राचा वापर करून राहूचे मस्तक धडावेगळे केले. त्यामुळे राहू अमर होऊ शकला नाही. राहूचे धडावेगळे केलेले मस्तक जेथे पडले त्या स्थानावर हे मंदिर बांधले गेले आहे. तेथे राहूबरोबरच भगवान शंकरांचीही स्थापना करण्यात आली आणि आजही येथे देवांसोबत दानव पूजा केली जाते. आज हे मंदिर राहू मंदिर म्हणूनच प्रसिद्ध आहे.

मंदिराची शिल्पकला वेगळी पण फारच आकर्षक आहे. या पश्चिममुखी मंदिरात राहूदशा शांतीसाठी तसेच शिव आराधनेसाठी दूरदूरून भाविक मोठ्या संख्येने येत असतात.

Leave a Comment