फरारी मिनी ट्रॅक्टरची भारतात धूम

tractor
फरारी म्हटले की कुणाच्याही नजरेसमोर ताशी ३०० किमीच्या वेगाने झूम जाणारी फरारी स्पोर्टस कार येणे साहजिक आहे. मात्र भारतात सध्या लोकप्रिय होत अ्सलेली फरारी एक्स्प्रेस वे वरून नाही तर चक्क शेतातून पळते आहे. कारण हा आहे फरारीचा मिनी ट्रॅक्टर. शेत नांगरणीसोबतच अन्य शेतकामे करणारा फरारी ब्रँडचा हा ट्रॅक्टर गेली तीन वर्षे भारतात आयात केला जात आहे. अर्थात फरारी ट्रॅक्टर कंपनी आणि फरारी कार कंपनी यांचा आपसात कांहीही संबंध नाही. फरारी ट्रॅक्टर ही इटालीचीच कंपनी आहे.

१९५४ पासून ही कंपनी ट्रॅक्टर उत्पादन करते आहे. १९८० साली कृषी अवजारे बनविणार्‍या बीसीएस कंपनीने ही कंपनी खरेदी केली. भारतात हे ट्रॅक्टर एक्स्कॉर्ट कंपनी आयात करते. २६ हॉर्सपॉवर ते ९८ हॉर्सपॉवर क्षमतेचे ट्रॅक्टर फरारीत तयार होतात व संपूण युरोपात ते अतिशय लोकप्रिय आहेत. भारतात आयात केले जाणारे ट्रॅक्टर हे सर्वात छोटे के ३० मॉडेल आहे. भारतातला हा पहिला एक्झिक्युटिव्ह ट्रॅक्टर म्हणून लोकप्रिय आहे.

या ट्रॅक्टरला गिअर शिफ्टिंगसह बसण्यासाठीच्या सुविधा अगदी कार सारख्या आहेत. त्याला १२ स्पीड गिअर बॉक्स, ११२३ सीसीचे ३ सिलींडरवाले इंजिन, पॉवर स्टीअरिंग दिले गेले आहे. सध्या त्याची किंमत ८ लाखांच्या घरात आहे. मात्र लवकरच भारतातच त्याचे उत्पादन सुरू होणार असून त्यानंतर किमती कमी होतील असे समजते. भारतात सध्या ६ परदेशी व १६ देशी कंपन्या ट्रॅक्टर उत्पादन क्षेत्रात आहेत. दरवर्षी या कंपन्या ६ लाख ट्रॅक्टर तयार करतात पैकी ५ लाख देशातच विकले जातात व उरलेले निर्यात केले जातात. महिद्रा ही जगातली सर्वात मोठी ट्रॅक्टर उत्पादक कंपनी असून त्यांनी आत्तापर्यंत १० कंपन्या टेकओव्हर केल्या आहेत.

Leave a Comment