हनीमूनची कूळकथा

honey
आजकाल विवाहापेक्षाही हनीमूनला कुठे जाणार याचीच चर्चा अधिक होत असते. हनीमून हा आता विवाहाचाच एक अविभाज्य भाग बनला आहे. मात्र हनीमूनचा उगम झाला कसा आणि हा शब्द कुठून आला याविषयी फारच थोड्या लोकांना माहिती असेल. हनी म्हणजे मधू व मून म्हणजे चंद्र अशी या शब्दाची सरळ फोड करता येते. मराठीत मधुचंद्र, नेपाळीत मधुमास, सिंहली भाषेत मधुसमय, बंगाली भाषेत मधुचंद्रिमा या नावाने येणार्‍या या शब्दाचा अर्थ चंद्राशी कांही तरी निगडीत असा नक्की करता येतो. म्हणजे जेव्हा कालगणना चंद्राच्या कलेवरून केली जात असे त्या काळात या शब्दाचा उगम झाला असावा असा तर्क लढविला जातो. १६ व्या शतकात रिचर्ड ह्यूलेट यानी नवविवाहितांनी एकांतात एकमेकांसोबत घालविण्याचा काळ असा आधुनिक अर्थ दिला.

honey1
चार हजार वर्षांपूर्वीच्या बॅबिलॉन संस्कृतीत याचे संदर्भ सापडतात. त्या काळात विवाहानंतर पहिल्या चंद्रापासून पुढे महिनाभर जावयाला मधापासून बनविलेली दारू दिली जात असे. वधूपिता ही दारू देत असे. विवाहानंतरचे प्रेम चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत जावे असा त्यामागे उद्देश होता. १८ व्या शतकात हा शब्द फार प्रचलित झाला. असेही सांगतात की भारतीय शब्दावरून घेतला गेला. १८ व्या १९ व्या शतकात ब्रिटन व युरोपमध्ये हा शब्द प्रचलित झाला मात्र तेव्हा हनीमून म्हणजे केवळ नवविवाहितांनी एकत्र घालविलेला काळ असा त्याचा अर्थ नव्हता. तर लग्नासाठी जे कोणी मित्र, नातेवाईक येऊ शकले नाहीत त्यांना नवविवाहितांनी जाऊन भेटणे मग ते दुसर्‍या गावी असले तरी, असा अर्थ होता. हा प्रवास नवरा बायको दोघेच नाही तर बहुदा सर्व कुटुंबियांसमवेत केलेला असे.

हनीमूनला पर्यटनाचा संबंध युरोपियन लोकांनी जोडला. आता हनीमून म्हणजे नवविवाहित जोडप्याने एकत्र एखाद्या रमणीय स्थळी एकांतात घालविण्याचा काळ असा अर्थ रूढ झाला आहे. अमेरिकेसारख्या देशात जेथे एकापेक्षा अनेक लग्ने सहज केली जातात, त्या देशात दरवर्षी सरासरी ८ अब्ज डॉलर्स हनीमून प्रवासासाठी खर्च होतात असे आकडेवारी सांगते. म्हणजे सरासरी दर जोडपे ३६०० डॉलर्स हनीमूनवर खर्च करत असते.