वर्षभरात ६५ हजार सौर पंप बसवून भारताचा जागतिक विक्रम

solar-pump
नवी दिल्ली : अक्षय ऊर्जा क्षेत्रात केंद्र सरकारने राबविलेल्या धोरणांनतर गेल्या एका वर्षात संपूर्ण देशात ६५ हजार सौर पंप बसवून भारताने जागतिक विक्रम केला असल्याची माहिती अक्षय ऊर्जा मंत्रालयाचे संयुक्त सचिव तरूण कपूर यांनी दिली. आम्ही येत्या काळात १ लाख नवे सौर पंप बसववण्याचे लक्ष्य ठेवले असल्याचे त्यांनी नमूद केले.

नाबार्डकडून सौर ऊर्जा पंपांसाठी शेतक-यांना ४० टक्के अनुदान आणि कर्जदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहे, असे कपूर यांनी सांगितले. आगामी काळात विविध माध्यमातून विजेचे २० हजार मेगावॅट एवढेअतिरिक्त उत्पादन करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर ३ ते ४ महिन्यांमध्ये याबाबत निविदा काढल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या देशात सौर ऊर्जेपासून वीज निर्मितीची क्षमता ७ हजार मेगावॅट आहे आणि २० हजार मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प लवकरच सुरू होण्याच्या मार्गावर आहेत.

सौर पार्कांमध्ये या शिवाय १० ते ५० मेगावॅटच्या सौर प्रकल्पांचा विस्तार प्रत्येक जिल्ह्यात करण्यात येणार आहे. येत्या २०२० पर्यंत एक लाख मेगावॅट सौर ऊर्जा उत्पादनाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. दरम्यान देशात वीज उपकरणांचे उत्पादन करणारी प्रसिद्ध कंपनी हॅवेल्स इंडिया आपली क्षमता वाढविण्यावर भर देत आहे. याच महिन्यात ही कंपनी सौर ऊर्जा क्षेत्रात अनेक उत्पादन लाँच करणार आहे. सौर ऊर्जा उत्पादन प्रणाली, घरगुती लाइटिंग किट, सौर पंप, स्ट्रीट लाइट आदी उत्पादने याच महिन्यात बाजारात आणण्याची शक्यता आहे. सौर ऊर्जेवरील सरकारचा फोकस पाहता कंपनीने या क्षेत्रात अग्रेसर राहण्याचे ठरविले आहे. लवकरच देशभरात या उत्पादनांना एकाचवेळी लाँच करण्यात येण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. या सर्व उत्पादनांची निर्मिती राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील निमराना येथील कारखान्यात केले जाणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

Leave a Comment