जादवपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्याला गुगलचे १ कोटींचे पॅकेज

jadavpurt
कोलकाता – जादवपूर विद्यापीठात गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या गोंधळामुळे विद्यापीठाचे नाव खराब झाले होते. मात्र या विद्यापीठातील विद्यार्थ्याला गुगलने दिलेल्या पॅकेजमुळे या विद्यापीठाला स्वतःचे नाव सुधारण्याची चांगली संधी मिळाली आहे. या विद्यापीठातील विद्यार्थ्याला तब्बल १.१ कोटी रुपयांचे पॅकेज यंदा गुगलने दिले आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पॅकेजमध्ये १० लाखांहून अधिक वाढ झाली आहे.

विद्यापीठातील कंप्यूटर सायन्स आणि इंजिनीअरिंग विभागात शिकणार्‍या आसिफ अहमद याला गुगलने हे पॅकेज दिले आहे. आसिफची सिंगापूर येथील प्रोजेक्टसाठी निवड केली असून आसिफला मिळालेल्या पॅकेजमध्ये गुगलचे शेअर, बोनस, मुख्य पगार आणि अन्य सवलतींचा समावेश आहे.
जादवपूर विद्यापीठाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावले असून आशियातील सर्वोत्तम विद्यापीठात तसेच ब्रिक्स देशांमधील सर्वोत्तम १०० विद्यापीठामध्ये स्थान मिळवल्याचे कुलगुरू सुरंजन दास यांनी सांगितले आहे. तसेच यंदा या विद्यापीठातील अनेक विभागातील विद्यार्थ्यांना मोठ्या पगाराच्या नोकर्‍या मिळाल्या आहेत. दरम्यान, आसिफला केवळ गुगलनेच नाही तर अन्य जागतिक कंपन्यांनीही ऑफर दिली होती. मात्र गुगलने सगळ्या कंपन्यांपेक्षा अधिक ऑफर दिल्याचे आसिफने सांगितले.