अरुंधती भट्टाचार्य होऊ शकतात आरबीआयच्या पहिल्या महिला गव्हर्नर?

arundhati-bhattachary
नवी दिल्ली – भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर रघुराम राजन यांना दुसऱ्यांदा कार्यकाळ मिळेल की नाही, याबाबत तर्कवितर्क सुरू असतानाच आरबीआयच्या पहिल्या महिला गव्हर्नर म्हणून भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांची नियुक्ती होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

येत्या सप्टेंबर महिन्यातच रघुराम राजन आणि अरुंधती भट्टाचार्य यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. रघुराम राजन यांना दुसरा कार्यकाळ मिळेल, अशी अपेक्षा काही जण व्यक्त करत असतानाच अरुंधती भट्टाचार्य यांच्यासह मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम्, सेबीचे प्रमुख यु. के. सिन्हा हेदेखील या शर्यतीत असल्याचे समजते.

एसबीआयच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून भट्टाचार्य यांनी कार्यभार सांभाळला होता. भट्टाचार्य यांना फोर्ब्जने जाहीर केलेल्या आर्थिक क्षेत्रातील पाच शक्तिशाली महिलांच्या यादीत पाचवे स्थान देण्यात आले होते. शिवाय फोर्ब्जच्या सर्वांत शक्तिशाली १०० महिलांच्या यादीत अरुंधती भट्टाचार्य २५ व्या स्थानी आहेत.

देशातील सुमारे २०० वर्षे जुन्या बँकिंग व्यवस्थेला तंत्रज्ञानावर आधारित बँकिंग यंत्रणा बनविण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वात एसबीआयच्या नेटवर्कचा विस्तार होऊन बँकेच्या १७ हजार शाखा झाल्या. शिवाय एसबीआयची ३६ देशांमध्ये उपस्थिती आहे.

Leave a Comment