नेतरहाट- दाट जंगले आणि सुंदर धबधब्यांचे स्थान

falls
भारतात अन्य पर्यटन स्थळंाचा ज्या गतीने विकास होतो आहे, त्या मानाने दाट जंगलांचे झारखंड राज्य अजून मागे पडले आहे. मात्र येथील सुंदर व अनटच्ड पर्यटन स्थळेही आता पर्यटन नकाशावर येऊ लागली आहेत. त्यातीलच एक आहे रांची पासून १५४ किमी पश्चिमेकडे असलेले नेतरहाट. छोटा नागपूरची राणी अशी या स्थळाची ओळख आहे. समुद्रसपाटीपासून ३७०० फूट उंचावरचे हे निसर्गरम्य स्थळ उन्हाळ्यात हिल स्टेशन म्हणून गजबजते तर पावसाळ्यात येथील मनोरम धबधब्यांसाठी आणि नेत्रदिपक सूर्योदय व सूर्यास्तासाठीही प्रसिद्ध झाले आहे.

surya
या भागात अनेक धबधबे आहेत. त्यातील प्रमुख नेतरहाट, लोध फॉल्स व सडनी फॉल्स हे होत. जवळच असलेल्या बेतला अभयारण्यात अनेक वन्य पशूपक्षीही पाहायला मिळतात. शिवाय राजरप्पा फॉल्स, सुरजकुंड येथील गरम पाण्याची कुंडे, केनारी हिल्स येथेही पर्यटनाचा आनंद घेता येतो. मान्सून आता झारखंडच्या उंबर्‍यावर आला आहे. या काळात पावसाळी पर्यटनाला निघायचे तर नेतरहाट फारच मस्त पर्याय आहे. येथील सूर्योदय आणि सूर्यास्त अक्षरशः सप्तरंगी असतात. आज घडीला येथे सुमारे १५० चित्रपटांचे शूटिंग सुरू असल्याचे समजते.

नेतरहाट धबधबा या राज्यातील दोन नंबरचा मोठा धबधबा आहे. सूर्योदयाच्या वेळी त्याच्या अंगावर उमटणार्‍या इंद्रधनुषी छटा, त्यातून उगवणारा लाल रंगी सूर्य सगळ्या परिसराला स्वप्नवत करून सोडतो. सूर्यास्त पाहण्यासाठी मात्र येथून १० किमी दूर असलेल्या मॅग्नोलिया पॉईंटवर जावे लागते. येथे राहण्याची उत्तम सोय आहे. या बरोबरच या भागात पावसाळ्यात चहूबाजूने लपेटलेली हिरवाई, विद्या, लोध, उपरी घाघरी, निचली घाघरी अशा नावांचे खळाळत वातावरणात मधुर नाद मिर्माण करणारे झरे मनाला अभूतपूर्व शांतता मिळवून देतात.

Leave a Comment