ओरलँडो हत्याकांडाचे परिणाम

florida
जिथे लोक राहतात तिथे काही प्रमाणात आणि काही ना काही कारणाने हिंसाचार दिसून येतोच पण माणूस जसजसा सुधारतो तसा तो अहिंसक जीवन जगतो. म्हणूनच महात्मा गांधी यांनी हिंसारहित जीवन हे मानवाच्या उन्नतीचे खरे लक्षण मानले होते. अमेरिकेतले लोक सुधारले आहेत पण तिथे एक वेगळ्या प्रकारचा हिेंसाचार अधुनमधुन प्रकट होत असतो आणि तो आपल्या मनात अनेक प्रश्‍न निर्माण करीत असतो. तिथले लोक असा हिंसेचा आधार घेत असतील तर त्यांना सुधारलेले कसे म्हणावे अशी अस्वस्थता आपल्या मनाला घेरून राहते. काल अमेरिकेच्या ओरलँडोत एका माथेफिरूने समलिंगी लोकांच्या क्लबवर हल्ला केला आणि तिथे अंधाधुंद गोळीबार करून पन्नास लोकांना ठार केले. ही घटना घडण्यापूर्वी बरेच नाट्य घडले. शेवटी या प्रकाराने त्या क्लबचे सुरक्षा रक्षक जागे झाले आणि त्यांनी त्या माथेफिरू मारेकर्‍याला गाठून त्याच्यावर गोळीबार केला आणि त्याला ठार केले. या प्रकाराने फारच प्रक्षुब्ध प्रतिक्रिया उमटल्या. त्यातल्या त्यात मारेकरी हा मुस्लिम असल्याने या प्रतिक्रियांना एक वेगळाच रंग प्राप्त झाला.

एखादा मानसिकदृष्ट्या असंतुलित असलेला असा वेडा एकदम एखाद्या गर्दीत शिरतो आणि तिथे स्वैरपणे गोळीबार करून अनेकांना उगाचच मारत राहतो. तो स्वत: मनाने अस्थिर आणि असंतुलित असतो. त्यातून तो अशा लोकांना ठार करतो की ज्यांचा त्याच्या या मानसिक अवस्थेशी काही संबंध नसतो आणि त्यातले कोणीही त्याच्या या अवस्थेला कारणीभूत नसते. हिसाचारापासून जगातला कोणताही देश मुक्त नाही पण या प्रकारचा हिंसाचार ही अमेरिकेसारख्या श्रीमंत आणि सुधारलेल्या देशाचे वैशिष्टय होऊन बसले आहे. गेल्या काही वर्षात असे अनेक प्रकार घडले आहेत. एकदा एका माथेफिरूने एका चित्रपटगृहाच्या बाहेर असाच गोळीबार केला होता. एवढेच नाही तर एक शाळकरी मुलानेही आपल्या शाळेतल्या काही मुलांचे असाच स्वैर गोळीबार करून प्राण घेतले होते. या अशा लोकांच्या मानसिकतेचे विश्‍लेषण केल्यानंतर असे आढळून येते की हे लोक कौटुंबिक सुखाला पारखे झालेले असल्याने मानसिक संतुलन हरवून बसलेले असतात. ते नेहमीच असंतुष्ट असतात आणि त्याच मानसिक अवस्थेत त्यांच्याकडून अशा घटना घडतात. अमेरिकेने भौतिक सुखाची परमावधी गाठली आहे पण तिथली कुटुंब व्यवस्था बरबाद झालेली आहे. म्हणून हा देश पैशाने श्रीमंत पण सामाजिक दृष्ट्या दरिद्री झाला आहे.

ओरलॅँडो हत्याकांडातला आरोपी आता स्वत:च पोलिसांकडून ठार झाला आहे पण त्याचे काही लागेबांधे शोधण्यात यश आले असून काही कारणांवर प्रकाश पडला आहे. आरोपी हा अफगाण आर्ईबापांच्या पोटी जन्माला आलेला होता. त्याचे आई बाप हे स्थलांतरित असून आता अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. त्यांचा हा सुपुत्र मात्र अमेरिकेत जन्माला आला आहे. तो पदवीधर आहे आणि त्याचा विवाह उझबेकिस्तानातून आलेल्या एक मुलीशी झाला होता. जो माणूस डोके फिरले म्हणजे जनावरापेक्षाही अमानुषपणे वागतो त्याचा संसार आणि वैवाहिक जीवन कसे असेल याचा आपल्याला अंदाज येतोच. त्याचा हा विवाह केवळ दोन वर्षे टिकला. तो आपल्या पत्नीशी फार वाईट रितीने वागत असे. त्यांना एक मुलगा आहे. तो पाच वषार्र्ंचा असून आता बापाकडे म्हणजे या विकृत मारेकर्‍याकडे रहात होता. या मारेकर्‍याला समलिंंगी लोकांविषयी फार चीड होती आणि तो विषय निघत असे तिथे समलिंगींविषयी फार चिडून बोलत असे. मात्र तो या रागापोटी त्यांना अशा रितीने आपल्या बंदुकीची शिकार बनवेल असे कोणालाच वाटत नव्हते. तो डोके फिरल्यागत वागत होता पण तो एवढे हत्याकांड घडवील असे कोणाला वाटत नसल्याने या प्रकाराने त्याला ओळखणारे फार हादरून गेले आहेत.

महवाची बाब म्हणजे अमेरिकेत अशा लोकांना बंदुक बाळगण्याचा परवाना मिळतो. तिथे शस्त्राचा परवाना फार स्वस्त आणि सुलभ नाही. तो अनेकांकडे असला तरीही तो मिळवणे सोपे नसते. याही आरोपीच्या वर्तनाबाबत अनेकांना शंका होत्या. तसेच त्याचे अतिरेक्यांशी संबंध आहेत असा संशय असल्याने त्याची दोन वेळा कसून तपासणी झालेली आहे. त्या चौकशीतून तो निर्दोष सिद्ध होऊन बाहेर पडला असला तरीही त्याच्या संबंधात हाती आलेल्या अर्ध्या कच्च्या पुराव्याच्या आधारे का होईना पण त्याला शस्त्राचा परवाना नाकारयला हवा होता. तो न नाकारल्याने त्याला हे कृत्य केले. त्याच्याकडे दोन शस्त्रे होती. अमेरिकेसह सार्‍या जगातच मुस्लिमांकडे संशयाने पाहिले जात आहे. त्यातच या मारेकर्‍याने हे हत्याकांड घडवण्या आधी आयएस आयएस या जगात सध्या गाजत असलेल्या संघटनेेशी संपर्क साधला होता असे आढळून आले आहे. त्याच्या वडलांनी या घटनेचा धर्माशी काही संबंध नाही असा खुलासा केला आहे पण शेवटी मुस्लिम धर्मात अशा लैंगिक वर्तनाबाबत कडक नियम आहेत आणि त्याचा काही तरी प्रभाव या मारेकर्‍याच्या मनावर पडलाच असणार आहे. केवळ इस्लामच नाही तर हिंदू धर्मातही अशा लैंगिक वर्तनाला त्याज्य मानलेले आहे पण त्यापोटी अशा लोकांना गोळ्या घालून ठार करण्याची मानसिकता फार घातक आहे.

Leave a Comment