नेपच्यूनच्या पलीकडे असू शकतो नववा ग्रह

planet
लंडन : आपल्या सौरमालेत आता प्लुटोचे ग्रह पद रद्द होऊन त्याला बटुग्रह घोषित केल्यानंतर आठच ग्रह राहिले असून पण जर सौरमालेत नेपच्यूनच्या पलीकडे एखादा ग्रह असेल तर तो आपल्या सूर्याने दुस-या एखाद्या ता-यापासून पळविला असावा व ही घटना ४.५ अब्ज वर्षांपूर्वी घडली असावी. सैद्धान्तिक पातळीवरील हा ग्रह खरोखर असेल तर तो सौरमालेतील पहिला बाह्य ग्रह असेल, असा दावा खगोल वैज्ञानिकांनी केला आहे. सौरमालेबाहेरील ग्रह म्हणजे बाह्य ग्रह असतो.

याबाबत स्वीडनमधील ल्यूंड विद्यापीठातील खगोल वैज्ञानिकांनी म्हटले आहे की, नववा ग्रह असण्याची शक्यता जास्त आहे व तो आपल्या सूर्याने पळविलेला असावा व तेव्हापासून तो आपल्या सौरमालेत अज्ञातावस्थेत असावा. आपले खगोलवैज्ञानिक शेकडो प्रकाशवर्षे दूर असलेले अनेक बाह्य ग्रह इतर सौरमालेत शोधत आहेत पण त्यातील एक ग्रह अगदी आपल्या परसदारी असण्याची शक्यता आहे, असे मत ल्यूंड विद्यापीठातील अलेक्झांडर मस्टील यांनी व्यक्त केले आहे. तारे हे तारकागुच्छात जन्मतात व त्या वेळी ते एकमेकांभोवती फिरता फिरता एकमेकांच्या कक्षेत फिरणारे ग्रह पळवू शकतात तसेच आपल्या सूर्याने नववा ग्रह पळविलेला आहे.

संगणकीकृत सादृश्यीकरणात ग्रह ९ हा सूर्याने जवळच्या ता-याभोवती फिरत असताना पळविला असावा, अशी शक्यता वर्तविली गेली आहे. यात सूर्य दुस-या ता-याच्या खूप जवळ आला असावा. नववा ग्रह मोठा असावा. त्यामुळे तो कक्षेतून सुटून सूर्याच्या कक्षेत आला असावा व सूर्याने ती संधी साधून मूळ ता-यापासून तो घेतला असावा, असे मस्टील यांनी म्हटले आहे.

जेव्हा सूर्य हा तारका समूहातून जन्मल्यानंतर निघाला तेव्हा नववा ग्रह त्याच्या कक्षेत चिकटून आला असावा. या ग्रहाचे अजून प्रकाशाच्या बिंदूइतकेही छायाचित्र नाही. आपल्याला तो खडकाळ, बर्फाचा की वायूचा आहे हेही माहीत नाही. एवढेच माहीत आहे की, तो पृथ्वीच्या दहा पट मोठा आहे. यावर खूप संशोधनाची गरज आहे. तो कदाचित आपल्या सौरमालेतील पहिला बाह्य ग्रह असावा. जर सिद्धान्त खरा असेल तर मस्टील यांच्या मते, सूर्य व पृथ्वी यांचे आकलन बदलेल. हा बाह्यग्रह असा असेल जेथे आपण अवकाश यानाच्या माध्यमातून पोहोचू शकू, असे त्यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment