४० वर्षांपूर्वी या ‘माऊली’ने उपजिवीकेसाठी घेतला ‘वस्तरा’ हाती

shantabai-yadav
मुंबई – सध्याच्या घडीला महिला या पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असल्या तरी अजूनही ग्रामीण क्षेत्राकडे ही गोष्ट थोडी अशक्यच आहे. आणि त्यातच ४० वर्षापूर्वी तर हा विचार देखील करणे दिवा स्वप्न होते. कोल्हापूरातील गडहिंग्लज तालुक्यातील हासुरसासगीरे या गावात अशाचवेळी एक अशी महिला आहे जिच्या समोर खऱ्या अर्थाने नतमस्तक व्हावेसे वाटते. आपल्या तरूणपणात परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि आपल्या पदरातील ४ मुलींना चांगले आयुष्य देण्यासाठी या माऊलीने चक्क हातात वस्तरा घेतला आणि आपल्या नवऱ्याचा हजामतीचा व्यवसाय पुढे सुरू ठेवला. अशा या माऊलीचे नाव आहे शांताबाई यादव.

पदरात तरुण वयातच ४ मुली असताना अचानक वैधव्य आले. अश्या परिस्थितीत सर्वसाधारण स्त्रीच्या मनात आत्महत्येचाच विचार येईल. त्यातच सासर आणि माहेरच्या मंडळींकडून सहानभूती दाखविणे तर दूरच घराबाहेर जाण्यास सांगितले. या परिस्थितीत देखील या माउलीने आपल्या ४ मुलीना जगवायचे ठरविले, त्यासाठी तिने ४० वर्षापूर्वी हातात थेट वस्तारा घेउन हजामत करण्यास सुरवात केली.

शांताबाई यांनी संस्कृती रक्षनाचे ठेके घेतलेल्या ठेकेदारांना आणि मस्तवाल गावगुंडांना एकच वाक्य सुनविले, मी आज परिस्थितीमुळे हातात वस्तारा घेउन हजामती करत आहे पण वाईट हेतूने आलात तर याच वस्ता-याने गळा चिरायला मागे पुढे बघणार नाही. गावगाड्यात पुरुषप्रधान व्यवसायात प्रवेश करून आज त्यांनी आपल्या चारही मुलींची लग्न देखील केली, आजही शांताबाई कोणाही जावयाकडे राहायला न जाता स्वहिमतीवर हजामातीचे काम करीत आहेत.

झी मराठीवरील लोकप्रिय चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाने देखील शांताबाई यादव यांच्या या कामाची दखल घेतली होती. त्यामुळे शांताबाई यादव यांच्या या कार्याची माहिती सर्वांना मिळाली आहे.

Leave a Comment