लैला मजनूची मजार असलेले बिजौर गांव

laila
प्रेमीजनांसाठी १५ जून ही तारीख विशेष महत्त्वाची आहे कारण या दिवशी लैला मजनू यांच्या स्मरणार्थ बिजौर येथे दोन दिवसांचा मेळा भरविला जातो. प्रेम म्हटले की सर्वप्रथम आठवतात लैला मजनू, शिरीफरहाद यांच्या कथा. शेकडो वर्षे उलटून गेली तरी या अमर प्रेमकथांची गोडी तसूभरही कमी झालेली नाही. नुकतेच लैला मजनूचे खरे फोटो प्रसिद्ध झाले आहेत आणि हे प्रेमी युगल प्रत्यक्षात अस्तित्वात होते की नाही या प्रश्नावर पडदाही पडला आहे. लैला मजनूचे भारताशीही एक वेगळेच नाते आहे. राजस्थानातील श्रीगंगानगरच्या अनूपगढ जवळच्या बिजौर गावी या प्रेमिकांची मजार आहे आणि आजही हजारो प्रेमी युगले व नवविवाहित जोडपी येथे मन्नत मागण्यासाठी येत असतात.

majnu
लैला मजनू मुळचे सिंध भागातले. या दोघांचे प्रेम जेव्हा लैलाच्या भावाला समजले तेव्हा चिडलेल्या भावाने या ठिकाणी मजनूला ठार केल्याची कथा सांगितली जाते. हे ठिकाण पाक सीमेपासून साधारण २ किमी अंतरावर आहे. लैलाला मजनूच्या मृत्यूची बातमी समजताच तीही येथे आली व त्याच्या प्रेताशेजारीच तिने आत्महत्त्या केली असेही सांगितले जाते. तर दुसरी कथा अशी की हे दोघे घरातून पळून येथपर्यंत आले पण तहानेने त्यांचा प्राण कासावीस झाला व त्यातच त्यांना मृत्यू आला.

भारतीय सेनेनेही या प्रेमी युगलाचा पूर्ण सन्मान राखला आहे व सीमा सुरक्षा दलाच्या एका चौकीला मजनू चौकी असे नांव दिले आहे. लैला मजनू मजारीवर सफल वैवाहिक जीवनाची मन्नत मागण्यासाठी केवळ हिंदू मुस्लीमच नाही तर शीख, ख्रिश्चन धर्मीयही येतात. कारगिल युद्धापूर्वी पाकिस्तानातून येणार्‍या प्रेमीजनांसाठी खुला रस्ताच होता. मात्र युद्धानंतर घुसखोरीच्या भीतीने हा रस्ता आता बंद केला गेला आहे.

Leave a Comment