चिरतारूण्यासाठीची गोळी दोन वर्षात येणार

goli
चिरतारूण्यासाठीची अँटी एजिंग गोळी येत्या दोन वर्षात उपलब्ध होत असल्याची बातमी आहे. टाईम मशीन प्रमाणे काम करणारी ही गोळी मॅकमास्टर विद्यापीठातील संशोधकांनी तयार केली असून त्या संदर्भातली माहिती जर्नल एनव्हायरमेंट अँड मॉलेक्यूल मुटेजेनेसिस मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.

भारतीय ग्रंथात ययाती राजाने त्याचा मुलगा पुरू याच्याकडून तारूण्य घेतल्याची कथा आपण ऐकलेली आहे. पुरूने स्वतःच्या तारूण्याचा वडीलांसाठी त्याग करून त्याचे वृद्धत्व घेतले व त्याचे बक्षीस म्हणून त्याला राज्य मिळाले होते. आता आधुनिक युगात मात्र आपलेआपणच एक गोळी घेऊन आपले वृद्धत्व दूर राखू शकणार आहोत. वास्तविक म्हातारपणामुळे येणारा विक्षिप्तपणा अथवा वयवाढीमुळे येणार्‍या अन्य व्याधींपासून झालेले नुकसान भरून काढण्यासाठी हे संशोधन केले गेले होते.

संशोधकांनी यात ३० जीवनसत्वे व कांही खनिजे एकत्र करून ही गोळी तयार केली आहे. त्याच्या प्राथमिक चाचण्या उंदरांवर यशस्वी झाल्या आहेत. या गोळीमुळे मेंदूच्या नष्ट होऊ पाहणार्‍या पेशींवर सकारात्मक परिणाम होत असल्याचे तसेच मेंदूच्या पेशी नष्ट होण्याचे प्रमाणही लक्षणीयरित्या कमी होत असल्याचे दिसून आले आहे. याचा फायदा अनेक गंभीर आजार बरे करण्यासाठीही होऊ शकणार आहे. तसेच जीवनाची गुणवत्ताही सुधारू शकणार आहे. या गोळीच्या आता मानवावर चाचण्या घेण्यात येत असून त्यानंतर या गोळ्या बाजारात उपलब्ध करून दिल्या जातील असे समजते.

Leave a Comment