जगन्नाथ मंदिराचा दगड करतो पावसाची भविष्यवाणी !

jagnnath-temple
कानपूर – कानपूरमधील एका पुराण काळातील जगन्नाथ मंदिराच्या गाभाऱ्याच्या छताला एक अलौकिक दगड जोडला गेला असून जो मान्सून येण्याची भविष्यवाणी १५ दिवस आधी करतो. कानपूर शहरापासून जवळपास ४५ किलोमीटर अंतरावर घाटमपूर परिसरात हे मंदिर आहे. घाटमपूरपासून ५ किलोमीटर आत बेहटा बुजुर्ग या गावात हे अद्भूत व विचित्र मंदिर आहे.

संपूर्ण भारतात गोलघुमट व सांचीच्या स्तूपसारखे दिसणारे हे मंदिर अनोखे आहे. याच्या बाह्य आकारावरून कोणीही म्हणणार नाही की हे मंदिर आहे. या मंदिराच्या विलक्षणतेचा अंदाज या गोष्टीमुळे लावता येतो की, मंदिराच्या मागील बाजूने पाहिल्यावर या मंदिराचे दोन घुमट दिसतात तर समोरून पाहिल्यावर केवळ एकच घुमट दिसतो. संपूर्ण उत्तरप्रदेशमध्ये हे अनोखे मंदिर मान्सूनची दिशा व काळ सांगते. या मंदिराच्या आत भगवान जगन्नाथजीच्या मूर्तीच्या बरोबर वरच्या बाजुला एक चमत्कारी दगड आहे. हा दगडच मान्सून येण्याची भविष्यवाणी करतो. मंदिरामध्ये भगवान जगन्नाथ, सुभद्रा आणि बलभद्र यांच्या मूर्ती आहेत. या दगडातून पाण्याचे थेंब टपकतात. लोकांच्या म्हणण्यानुसार मंदिरातील या दगडातून पाणी तेव्हाच टपकते जेव्हा मान्सून येणार असतो.

मान्सून येण्याच्या १५ दिवस आधी पाणी टपकणे सुरू होते व जोपर्यंत मान्सून उत्तरप्रेदशमध्ये दाखल होत नाही तोपर्यंत पाणी टपकणे सुरूच राहते. मान्सून आल्यानंतर पाणी टपकणे बंद होते. अशी आख्यायिका आहे की, या मंदिराचे निर्माण भगवान राम यांचे पूर्वज राजा शिबी दधीची यांनी केले आहे. भगवान श्रीराम जेव्हा लंकादहन करून परत आले होते त्यावेळी याच मंदिराच्या जवळ असणाऱ्या सरोवरात राजा दशरथ यांचे पिंडदान केले होते. तेव्हापासून या सरोवराचे नाव राम कुंड असे पडले आहे. काहींचे असे म्हणणे आहे की, जेव्हा सहा महिन्याची रात्र होती त्या प्रलयकाळात देवी-देवतांनी या मंदिराचे निर्माण केले आहे. लोकांचे असे मानने आहे की, जर या मंदिरातून पाणी टपकले नाही तर त्यावर्षी राज्यात दुष्काळ पडतो. पुरातन काळाचे हे मंदिर हवामान खात्यालाही आव्हान देत आहे. मंदिराच्या आत अनेक देवी-देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत.

Leave a Comment