३६० अंशात फिरणार फेसबुकचे फोटो!

facebook
मॅन्लो पार्क (कॅलिफोर्निया) – फेसबुकवर व्हर्च्युअल रिऍलिटी निर्माण करण्यासाठीची एक पुढची पायरी फेसबुकने गाठली असून ३६० अंशात फिरणारे फोटो फेसबुकवर अपलोड करणे शक्‍य झाले आहे. गुरुवारी ३६० अंशात फिरणारे दोन छायाचित्रे फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी फेसबुकवर अपलोड करत याबाबतची माहिती दिली आहे.

व्हर्च्युअल रिऍलिटीसाठी फेसबुकतर्फे विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. फेसबुकवर व्हीआरद्वारे छायाचित्रांमध्ये प्रत्यक्ष उपस्थित असल्याचा भास होईल, असा दावा फेसबुकच्यावतीने करण्यात आला आहे. मॅनहटन आणि अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाचे ३६० अंशात फिरणारे छायाचित्र झुकेरबर्ग यांनी अपलोड केले आहे. या छायाचित्रांवर माऊसने ड्रॅग (माऊस क्‍लिक करून फिरविणे) केल्यास स्थिर छायाचित्रात न दिसणाऱ्या बाजूपर्यंतही पोचता येते आणि तेथील दृश्‍य पाहता येणे शक्‍य होते. फेसबुकने यापूर्वी ३६० अंशात फिरणारे व्हिडिओ अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.

पोस्टमध्ये झुकेरबर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यातून पॅनोरमापद्धतीने (एकामागो एक) ३६० अंशात फिरणारे फोटो काढता येतात. याशिवाय अशाप्रकारचे फोटो काढण्यासाठी असलेल्या अॅप्सचाही वापर करता येऊ शकतो, असेही झुकेरबर्ग यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Leave a Comment