‘विद्यावाणी’अ‍ॅपच्या माध्यमाने मराठीतून मिळणार बॅकिंगची माहिती

mobile-app
पुणे: सर्वसामान्य नागरिकांपर्यंत बॅकिंग क्षेत्रातील सर्व माहिती सहज पोहचावी आणि त्याबाबत जनजागॄती व्हावी यासाठी पुणे येथील विद्या सहकारी बॅंकेने ‘विद्यावाणी’ नावाचे एक अ‍ॅप तयार केले असून महत्वाची गोष्ट म्हणजे या अ‍ॅपवरील सर्व माहिती ही मराठी भाषेत उपलब्ध असणार असल्यामुळे ही माहिती सर्वांनाच सहज वाचता येईल.

याबाबतची माहिती बॅंकेचे कार्यवाहक संचालक विद्याधर आनस्कर यांनी पत्रकार परिषदेत दिली. देशातील सर्व नागरी सहकारी बॅंकांना रिझर्व्ह बॅंकेने “कोअर बॅंकिंग‘ची प्रणाली अनिवार्य केल्यामुळे बॅंकेची आर्थिक सक्षमता तपासण्यासाठी सर्वसामान्यांना बॅंकिंग क्षेत्राचे ज्ञान असणे आवश्‍यक असल्यामुळे बॅंकिंग साक्षरता हे ध्येय डोळ्यापुढे ठेवून ‘विद्यावाणी’ हे अ‍ॅप विकसित केल्याचे अनास्कर यांनी सांगितले.

‘विद्यावाणी’ हे अ‍ॅप स्मार्टफोनधारकांना गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करता येणार आहे. बॅंकिंग क्षेत्राविषयीच्या अद्ययावत घडामोडी, त्याचे विश्‍लेषण आदीसह सर्व माहिती सोप्या मराठी भाषेमध्ये या अ‍ॅपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरिकांच्या शंका आणि प्रश्‍नांनाही उत्तरे देण्यात येणार असून, सूचनांचाही विचार करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांना ‘फिडबॅक’ ही देता येणार आहे. बॅंकिंगविषयी काही माहिती देऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनाही बॅंकेच्या माध्यमातून आपली माहिती या अ‍ॅपवर टाकता येणार आहे.

बॅंकेतील कागदपत्रे गहाळ होऊ नयेत यासाठी शंभर टक्के कागदपत्रांचे “डिजिटायझेशन‘ करण्यात आल्याची माहितीही अनास्कर यांनी दिली. त्यासाठी बॅंकेने नागरी बॅंकांमध्ये देशात पहिल्यांदाच “डॉक्‍युमेंट मॅनेजमेंट सिस्टिम सॉफ्टवेअर अँड डिजिटायझेशन सर्व्हिसेस‘ ही प्रणाली विकसित करून राबविल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment