रक्ताद्वारे ‘एचआयव्ही’ संसर्गाचे प्रमाण चिंताजनक

blood-donation
नवी दिल्ली: राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेच्या नोंदीत नमूद केल्याप्रमाणे सन २०१४ ते २०१६ या १७ महिन्यांच्या कालावधीत आजारपणात देण्यात आलेल्या रक्ताद्वारे ‘एचआयव्ही’च्या संसर्गाला बळी पडलेल्यांची संख्या तब्बल २ हजार २३४ एवढी आहे. केवळ निष्काळजीपणामुळे या रुग्णांना जीवघेण्या आणि लाजिरवाण्या ‘एड्स’ला बळी पडावे लागत आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांना माहिती अधिकार कायद्याखाली देण्यात आलेल्या माहितीत ही चिंताजनक आकडेवारी उपलब्ध झाली आहे.

असुरक्षित शरीरसंबंधाद्वारे ‘एचआयव्ही’ संसर्ग होत असल्याबाबत देशातच नव्हे; तर जगभरात मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे. या प्रयत्नांना उल्लेखनीय यश मिळत असल्याचे दिसून येत आहे. मात्र संक्रमित रक्ताद्वारे ‘एचआयव्ही’ संसर्गाचे प्रमाण रोखण्यात जगभरात; विशेषत: अप्रगत आणि विकसनशील देशात फारसे यश मिळालेले नाही. भारतात अशाप्रकारे संसर्गाचे प्रमाण टक्केवारीत केवळ १ टक्का एवढे दिसत असले तरी प्रत्यक्षात ही संख्या खूप मोठी आहे.

भारतात आवश्यकतेपेक्षा खूप कमी प्रमाणात रक्त उपलब्ध होते. रक्तदानाबाबत सामान्य नागरिकांची उदासीनता हे त्यामागील महत्वाचे कारण आहे. त्यामुळे रक्ताच्या काळ्या बाजाराचा धंदा येथे मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. अनेक जण केवळ पैशाच्या मोहाने वारंवार रक्तदान करतात. काळ्या बाजारातून आलेल्या रक्ताच्या तपासणी आणि साठवणीबाबत पुरेशी काळजी घेतली जात नाही.

अधिकृत ब्लडबँकेला प्रत्येक रक्तदात्याची ‘एचआयव्ही’ ‘हेपिटायटीस बी, सी आणि सिफलीसची चाचणी करणे आवश्यक आहे. मात्र त्याबाबत ब्लडबँका गलथानपणा करतात आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याची यंत्रणा सरकारकडे उपलब्ध नाही. या शिवाय ‘विंडो पिरीयड’ ही ब्लडबँकांना भेडसावणारी मोठी समस्या आहे. रक्तदाता ‘एचआयव्ही’ग्रस्त असला तरीही ‘विंडो पिरीयड’च्या कालावधीत; म्हणजे अनेक आठवड्यांपर्यंत त्याच्या रक्तात ‘एचआयव्ही’ची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. त्याचा कालावधी कमी करण्याची सुविधा उपलब्ध असली तरीही ती खर्चिक असल्याने त्याचा अवलंब केला जात नाही.

या आव्हानांमुळे सुरक्षित आणि मुबलक रक्तपुरवठा ही देशातील मोठी समस्या बनली असून रक्ताद्वारे होणारा ‘एचआयही’चा प्रसार ही गंभीर समस्या बनली आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment