थायरोकेअर कंपनीचे उज्ज्वल यश

velumuni
कोईम्बतूर जवळील एका मजुराच्या मुलाने बरीच मेहनत करून दोन लाख रुपयात थायरोकेअर ही कंपनी काढली आणि केवळ दहा वर्षामध्ये कंपनीचा व्याप एवढा वाढला आहे की कंपनीची मालमत्ता आता ३ हजार ३०० कोटी रुपयांची झाली आहे. कंपनीचे मालक श्री. अरोकिया स्वामी वेलूमणी यांच्या अंगी असलेली उद्योजकता आणि त्यांच्या पत्नीची त्यांना मिळालेली साथ यामुळेच हे घडले. वेलूमणी यांना चार भावंडे होती. परंतु आपण त्यांना सांभाळू शकत नाही हे त्यांच्या वडिलांच्या लक्षात आले आणि त्यांनी घराचा भार आपल्या पत्नीवर टाकला. वेलूमणी यांच्या आईने दोन म्हशींच्या जोरावर संसार सांभाळला आणि चारही मुलांना शिकवले. ए. वेलूमणी यांना भाभा ऍटोमिक रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये नोेकरी लागली. बीएसस्सी या डिग्रीच्या जोरावर लागलेल्या या नोकरीत त्यांनी थायरॉईड ग्रंथीचे निदान करण्याची कार्यप्रणाली शोधून काढली.

दरमहा ९०० रुपयांच्या पगाराच्या नोकरीत त्यांनी हे संशोधन केले. परंतु त्यांनी शोधलेली पध्दत वापरून हजारो डॉक्टर्स लाखो रुपये कमवायला लागले आहेत. ही गोष्ट त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी स्वतःच व्यवसाय सुरू करायचे ठरवले. त्यांची पत्नी बँकेत नोकरी करत होती. त्यामुळे त्यांना नोकरी सोडणे शक्य झाले आणि दोन लाख रुपये गुंतवणूक करून त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला. १९९५ साली सुरू झालेल्या या व्यवसायाचा व्याप खूप वाढला आहे. मात्र खंत एवढीच आहे की ज्या पत्नीच्या जीवावर त्यांनी उद्योगाचे साहस केले होते ती पत्नी आता हयात नाही. मात्र आता त्यांची मुले व्यवसायात वडिलांना मदत करत आहेत.

Leave a Comment