रफू सेंटर्स

repair-cafe
अमेरिका आणि भारत यांत फरक काय ? असा प्रश्‍न एका निवासी भारतीयाला विचारण्यात आला तेव्हा त्याने एका वाक्यात उत्तर दिले होते. अमेरिकेतले लोक थोडी खराब झालेली चप्पल फेकून देतात पण भारतीय लोक तिला दोन तीनदा शिवून, वारंवार अंगठा बसवून अगदीच कामातून जाईपर्यंत वापरतात. कपड्यांचेही असेच. अमेरिकेतले लोक कपडे थोडे जुनाट दिसायला लागले की ते फेकून देतात. काही काही अमेरिकी लोक तर एक दोनदा वापरलेले कपडे फेकून देतात. भारतीय लोक त्या कपड्यांना अगदी रफू करून अगदीच झिझ्झिरीत होईपर्यंत वापरत राहतात. भारतीय लोक घरातल्या वस्तूही नीट करून वापरत राहतात. त्यांची संस्कृती काटकसरीची आहे आणि बंगळूरमधील मार्टिना पोस्टमा या महिलेने या रफू संस्कृतीतून एक छान बिजनेस उभा केला आहे. या उद्योगाला नाव दिले आहे. रिपेअर कॅफे.

या कॅफेत अनेक कामगार काम करीत असतात आणि ते जुनी घड्याळे, जुने मिक्सर, जुन्या इस्तर्‍या, अशा जुन्या आणि थोड्या नादुरुस्त झालेल्या वस्तू दुरुस्त करून देत असतात. या कॅफेत प्रवेश करायला ५० रुपये प्रवेश फी घेतली जाते. एकदा आत प्रवेश केला की आपल्याला हवा तो कारागीर गाठायचा आणि आपली वस्तू दुरुस्त करून घ्यायची. ती तिथे दुरुस्त झाली की पुढे अनेक वर्षे वापरता येते. उकरड्यावर टाकून देण्याची गरज नाही. या रिपेअर कॅफेचे काम एवढ्यावरच थांबत नाही. त्यांची वर्कशॉप असतात. तिथे जाऊन आपणही एखादी वस्तू दुरुस्त करण्याची कला आत्मसात करू शकतो.

आपल्या या व्यवसायामुळे अनेकांना रोजगार मिळाला, अनेकांची खर्चाची बचत झाली. या लोकांना आपण या वस्तू दुरुस्त करून दिल्या नसत्या तर त्यांनी त्या कचर्‍याच्या टोपल्यांत फेकून दिल्या असत्या आणि त्या कुजून त्यांचा कर्बवायू हवेत पसरला असता. म्हणजे आपल्या या उपक्रमाने हवेचे प्रदूषणही रोखण्यात यश मिळवले आहे असा दावा मार्टिना पोस्टिमा यांनी केला.

Leave a Comment