कॅलिफोर्निया – व्हॉटसअॅपने मेसेंजर अॅपच्या स्पर्धेत आपले वेगळेपण टिकवून ठेवण्याचा प्रयत्न कायम ठेवत जीफ (GIF) स्वरुपातील छायाचित्रे शेअर करण्याची सुविधा प्राप्त करून दिली असून ही सुविधा सुरूवातीला केवळ आयफोन बेस्ड स्मार्टफोन्ससाठी देण्यात आलेली असून लवकरच ऍड्रॉईडसाठीही उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आता व्हॉटसअॅपवरून देखील पाठवता येणार जीफ (GIF) इमेज!
सतत नवनवे अपडेटस देत युजर्सना नवनवीन सुविधा इन्स्टंट मेसेंजर अॅप म्हणून लोकप्रिय ठरलेल्या व्हॉटसअॅपने दिल्या आहेत. त्यामध्ये अलिकडेच पीडीएफ स्वरुपातील फाईल सपोर्ट, टेक्स फॉरमॅटिंग (बोल्ड, इटॅलिक) आदी सुविधा दिल्या आहेत. आता यापुढे जीफ (GIF) स्वरूपातील छायाचित्र शेअर करण्याची सुविधा देण्यात आली आहे. फेसबुकवरील ऑटो प्ले व्हिडिओजप्रमाणे व्हॉटसअॅपवरील या जीफ इमेजेस प्ले होतील. याशिवाय लवकरच व्हिडिओ कॉलिंगची सुविधाही येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या सुविधेमुळे व्हॉटसअॅपच्या लोकप्रियतेत भर पडेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.